आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर शहर व परिसरात शनिवारी साडेअकरा वाजेपासून सुरू झालेल्या पावसाने दाणादाण उडवली आहे. तब्बल दीड तास मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे उपनगरातील सावेडी भागातील प्रोफेसर कॉलनीतील रस्त्यावर असलेली दुकाने पाण्याखाली गेली.
व्यावसायिकांची उडाली दाणादाण
अहमदनगर शहरातील सर्जेपूरा, दिल्ली गेट चौपाटी कारंजा, माळीवाडा यासह सावेडी, भिंगार, केडगाव, नवनागापूर पाईपलाईन रोड तपोवनरोड या उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. अहमदनगर शहरात अचानक सुरू झालेल्या पावसामुळे व्यावसायिकांची मोठी दाणादाण उडाली. शहरातील एकविरा चौकात अचानक सुरू झालेल्या पावसामुळे भाजीविक्रेत्यांची देखील धावपळ उडाली. शहरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.
चालकांची तारेवरची कसरत
या पावसामुळे शहरातील व उपनगरातील रस्त्यावर पाणी साचले होते. शहरातील सावेडी येथील प्रोफेसर कॉलनीत मुसळधार पावसामुळे रस्त्यावर असलेली दुकाने पाण्याखाली गेली होती. प्रेमदान चौक पाण्याखाली होता. त्यामुळे वाहन चालकांना या चौकातून वाहने काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत 232 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर सुरू झाल्यामुळे भंडारदरा, निळवंडे या प्रमुख धरणातून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी बारा वाजता भंडारदरा धरणातून प्रवरा नदी पात्रात 826, निळवंडे धरणातून 1 हजार 50, ओझर बंधाऱ्यातून 1 हजार 392, नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदी पात्रात 1 हजार 614 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
आतापर्यंत झालेला पाऊस
नगर 204, पारनेर 208, श्रीगोंदे 212, कर्जत 175, जामखेड 256, शेवगाव 289, पाथर्डी 249, नेवासे 249, राहुरी 245, संगमनेर 207, अकोले 399, कोपरगाव199, श्रीरामपूर 207, राहता 159 पाऊस झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.