आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात कचरा संकलन व वाहतूक करणाऱ्या स्वयंभू ट्रान्सपोर्ट या संस्थेच्या ठेक्याची मुदत संपुष्टात आली आहे. नवीन विविध प्रक्रिया अद्यापही झाली नसल्याने या संस्थेमार्फत सध्या काम सुरू आहे. मात्र ऑगस्ट महिन्यापासून महापालिकेने या संस्थेची सुमारे पावणेतीन कोटी रुपयांची बिले थकविली आहेत. त्यामुळे संस्थेने काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.
संस्थेने यासंदर्भात मनपा आयुक्तांना पत्र दिले आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यांच्या कालावधीतील कचरा संकलन व वाहतुकीच्या कामाचे २.८० कोटींचे बिल अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे कामगारांचे पगार, वाहनांसाठी लागणारे डिझेल, देखभाल-दुरुस्ती करणे आदींमध्ये आर्थिक अडचणी येत आहेत. त्याचा परिणाम शहरातील कचरा संकलन व वाहतुकीवर होऊ शकतो. काम सुरळीत राहण्यासाठी थकीत बिले तत्काळ अदा करावीत. अन्यथा कचरा संकलन व वाहतुकीचे काम बंद करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी महापालिकेचीच राहील, असे संस्थेने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
महापालिकेकडे चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगातून घनकचरा व्यवस्थापन विभागातील प्रकल्प व सेवांसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होतो. चालू आर्थिक वर्षातही या वित्त आयोगाच्या निधीतून कचरा संकलन व वाहतुकीसाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी पुन्हा महासभेत या बिलांसाठी तरतूद करण्यात आली. असे असतानाही बिले का अदा झाली नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे.
मनपाला ‘स्वयंभू’चाच आधार शहरात गेल्या तीन वर्षांपासून स्वयंभू ट्रान्सपोर्ट मार्फत कचरा संकलनाचे काम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून संस्थेच्या कामाबाबत तक्रारी होत असल्या, तरी शहरातील कचऱ्याची समस्या मार्गी लावण्यात स्वयंभूचा मोठा वाटा आहे. सद्यस्थितीत महापालिकेकडे स्वतःची स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध नसल्याने नवीन निविदा अंतिम होईपर्यंत मनपाला ‘स्वयंभू’चाच आधार घ्यावा लागणार आहे.
निविदा प्रक्रिया संथगतीने कचरा संकलन व वाहतुकीसाठी महापालिकेने नव्याने निविदा मागवल्या आहेत. यात पुण्यातील बीव्हीजी इंडिया लिमिटेड, बेंगलोर येथील पी. गोपीनाथ रेड्डी व अहमदाबाद येथील श्री जी एजन्सी या तीन कंपन्यांच्या निविदा दाखल झाल्या आहेत. त्याची तांत्रिक छाननी अद्याप झालेली नाही. येत्या १२ डिसेंबरला छाननी होणार असल्याचे सांगण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.