आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१ जून ही राज्यातील सर्वात जास्त ज्येष्ठ मंडळींच्या वाढदिवाची तारीख. शाळेत नाव दाखल करताना शिक्षकांनी शासनाच्या चौकटीत विद्यार्थ्याचे वय बसावे म्हणून नोंदवलेली ही तारीख. पुढे हीच तारीख त्या व्यक्तीच्या जन्मदिनाची तारीख निश्चित झाली. वनकुटे व परिसरातील अशा तब्बल १५१ ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस फेटे बांधून, केक कापून साजरे करण्यात आले. लोकनियुक्त सरपंच राहुल झावरे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता.
१ जून जन्मतारीख असलेल्या ज्येष्ठांचे वाढदिवस आजवर बहुदा साजरेही झाले झाले नाहीत. अशाच ज्येष्ठांचे वाढदिवस साजरे करण्याचा निर्धार सरपंच झावरे यांनी केला. त्यासाठी एक उत्सवच साजरा करण्याचे नियोजन केले. ग्रामपंचायत कार्यालयासामोर त्यासाठी व्यवस्था करण्यात आली. ज्येष्ठ मंडळींबरोबर त्यांच्या परिवारातील सदस्यांनाही विशेष आमंत्रित करण्यात आले. मिष्ठान्न भोजनाचे तसेच मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने ज्येष्ठांच्या वाढदिवाचा आनंद व्दिगुणीत झाला.
शेतकरी बांधव असलेले, किंवा अशा पध्दतीने वाढदिवस साजरा न झालेले ज्येष्ठ नागरिक या सोहळ्यामुळे भारावून गेले. हा दिवस आम्ही कधीच विसरू शकणार नाही. अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. या उत्सवात महिलांची संख्याही लक्षणीय होती. निवृत्त शिक्षक, शासकिय कर्मचाऱ्यांनीही वाढदिवसाचा आनंद घेतला. सुरेश सिताराम गागरे,सदाशिव पंढरीनाथ वालझाडे, भिमराज मोहन मुसळे,भागा नाथा काळे, संतोष धोंडीबा डुकरे, संजय पंढरीनाथ औटी, बाळू यादव रांधवन,सुभाष तुकाराम खामकर, अजित चंद्रभान गागरे, संतोष नायकू केसरक, चंद्रकला माणिक वाबळे हे ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते.
सरपंच झावरे यांच्या या सामुदायीक वाढदिवसाचीही तालुक्यात चर्चा सुरू आहे. राज्यातील पहिली ग्रामसभा बोलवून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा विषय,गावात कोरोना लसीकरणाचा पहिला कॅम्प आयोजनचा राज्यातील पहिला प्रयोग अश्या सरपंच झावरे यांच्या उपक्रमांची चर्चा झाली आहे. गावातील यात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला राज्यपातळवरील कुस्त्यांचा आखाडाही राज्यात चर्चिला गेला. आता १५१ नागरिकांचे वाढदिवस साजरे करून झावरे यांनी वेगळेपण पुन्हा सिध्द केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.