आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर जिल्ह्यात 1 लाख 726 एकल महिला:राज्यात प्रथमच अहमदनगर जि.प. ने केला सर्व्हे, राज्यात सर्वेक्षण करावे : कुलकर्णी

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील एकल महिलांपर्यंत विविध कल्याणकारी योजना पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत व अंगणवाडी सेविकांमार्फत गावपातळीवर एकल महिलांचे सर्वेक्षण केले. त्यात १ लाख ७२६ एकल असल्याचे समोर आले. जिल्ह्यातील एकल महिलांचे नियोजनबद्ध सर्वेक्षण करणारा अहमदनगर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशीष येरेकर यांच्या आदेशानुसार ग्रामविकास अधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांच्या मदतीने गावातील अशा महिलांची माहिती संकलीत केली, त्यात १ लाख ७२६ एकल महिला असल्याचे समोर आले. या सर्वेक्षणामुळे महिलांच्या उन्नतीसाठी आर्थिक तरतूद करून विविध योजना राबवणे शक्य होईल. या सर्वेक्षणाच्या आधारे ८ मे रोजी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालिमठ यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी विविध विभागांचे अधिकारी व एकल महिलांसाठी काम करणाऱ्या साऊ एकल समितीचे कार्यकर्ते, महिला स्वयं रोजगारासाठी काम करणाऱ्या संस्था अशी एकत्रित बैठक आयोजित केली होती.

त्यात या महिलांच्या पुनर्वसनासाठी कृतिकार्यक्रम व प्रकल्प करण्याचे ठरवले. या सर्वेक्षणासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी ८ मार्चला महिला दिनानिमित्ताने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत या एकल महिलांच्या सभा आयोजित करण्यात आल्या. महिला दिनाला एकल महिलांच्या सभा आयोजित करणारा अहमदनगर हा पहिला जिल्हा आहे. या बैठकीत एकल महिलांचे प्रश्न गावाने समजून घेतले. त्या महिलांना कोणत्या शासकीय योजना देणे शक्य आहे याविषयी चर्चा केली. राज्यात सर्वात प्रथम झालेल्या या सर्वेक्षणाचे अनुकरण राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, नगर जिल्ह्यातील नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातही करायला हवे. एका जिल्ह्यात जर इतकी मोठी संख्या असेल तर राज्यात ही संख्या खूप मोठी असेल तेव्हा संपूर्ण राज्यात हे सर्वेक्षण सरकारने करायला हवे, असे साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले.

अशी आहे नगर जिल्ह्यातील एकल महिलांची संख्या

अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विधवा ८७२८७, घटस्फोटीत ५६४९, परितक्त्या ६४९२ तर ४० वर्षावरील अविवाहित महिलांची संख्या १ हजार ९८ असल्याचे सर्वेक्षणानंतर समोर आले. विधवा महिलांची मोठी संख्या संगमनेरमध्ये ९ हजार ८१८, राहाता ८७५४, नेवासे ९५६३ व पारनेर ९०४० या तालुक्यात आहे. घटस्फोटीत महिला अकोले १७८७ व शेवगाव १२६८ तालुक्यात आहे. परित्यक्ता महिलांची संख्या अकोले १६१२, शेवगाव ९७६ व संगमनेर ८३९ आहे, अशी माहिती समोर आली आहे.