आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुरक्षितता ही प्रत्येकाच्या जीवनात अविभाज्य घटक आहे. सुरक्षित राहून आपले काम निष्ठेने करणे आवश्यक आहे. सर्व कुशल कामगारांनी सुरक्षित राहून स्वतःचे आरोग्य सांभळून यश प्राप्त करावे. औद्योगिक क्षेत्रातील कामगारांविषयी माझ्या मनात असलेल्या आत्मीयतेने मी वयाच्या नव्वदीतही येथे आलो. मी मनाने अजून तरुण आहे. तुम्हीही कायम मन टाटावात व आनंदी ठेवा. पण जेव्हा आपण सुरक्षित राहू तेव्हाच आनंदी राहू शकतो. यासाठी कायम नियमांचे पालन करून सुरक्षित रहा. मनाला आनंदी, सशक्त व सुदृढ ठेवण्यासाठी रोज केवळ १८ वेळा श्वास मोजून छोटेसे ध्यान करा, असे आवाहन पद्मश्री डॉ.प्रभाकर मांडे यांनी केले. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय अहमदनगर विभागाच्या वतीने ५२ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्त गुरुवारी सकाळी नगर एमआयडीसी मधील विविध कंपन्यांच्या कामगार, अधिकाऱ्यांची पायी सुरक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रॅलीचा शुभारंभ पद्मश्री डॉ. मांडे व पद्मश्री पोपटराव पवार यांनी झेंडा दाखवून केला. यावेळी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे उपसंचालक स्वप्नील देशमुख,एमआयडीसी पोलिस स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र सानप आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सुरक्षा रॅलीत नगर जिल्ह्यातील विविध कारखान्याच्या तीन हजार कामगारांनी सहभाग घेतला. या सुरक्षा रॅलीने एमआयडीसी मधील प्रमुख रस्त्यांवरून सुमारे सात किलोमीटर फिरून जनजागृती केली. प्रास्ताविक स्वप्नील देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुरक्षा पोवाडा, सुरक्षा गीत, तसेच सन फार्मा कंपनीच्या कामगारांनी सादर केलेल्या सुरक्षिततेचे महत्त्व पटवून देणाऱ्या लघु नाटिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सुरक्षा रॅलीमध्ये एक्साइड इंडस्ट्रीज, स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आयएसएमटी लिमिटेड, सन फार्मासिटिकल या कंपन्यांचे सुरक्षा विषयी जनजागृती करणारे चित्ररथ लक्षवेधी ठरले.
नगरमध्ये कामगार साहित्य संमेलन आयोजित करावे
या रॅलीमुळे जिल्ह्यातील कामगार, अधिकारी व मालक वर्ग एकत्र येत असल्याने सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. स्वप्नील देशमुखांनी आता नगरमध्येच राहून सुरक्षिततेसाठी अधिक काम करावे. नगरमधील औद्योगिक क्षेत्रात अजून चांगले वातावरण निर्माण होण्यासाठी कामगार साहित्य संमेलन नगरमध्ये आयोजित करावे, असे आवाहन पद्मश्री पवार यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.