आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्षवेधी:..तर वनमंत्र्याच्या दालनात उपोषण; आमदार नीलेश लंके यांचा इशारा

पारनेर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वनविभागातील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी लंके यांची सूचना

तालुक्यातील पारनेर वनक्षेत्रात सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या गॅबियन बंधाऱ्यांच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्या सहायक उपवनसंरक्षक रमेश देवखिळे व पारनेर वनक्षेत्राचे प्रभारी वनक्षेत्रपाल प्रताप जगताप यांना निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आमदार नीलेश लंके यांनी गुरुवारी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून केली. दरम्यान, नियमबाह्य कामे करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दबाव टाकला जात असल्याने आत्मदहन करण्याचा इशारा वनपाल संदेश भोसले यांनी उपवनसंरक्षक कार्यालयाच्या आवारात बोलताना दिल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. आमदार लंके यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना वनमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पारनेर वनक्षेत्रात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी नाशिक प्रदेश वनक्षेत्राच्या मुख्य वनसंरक्षकांमार्फत करण्यात येईल. येत्या आठ दिवसांत चौकशी पूर्ण करण्यात येईल. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा मंत्री भरणे यांनी विधानसभेत केली.

वनमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी विधानसभेत घोषणा केल्याप्रमाणे येत्या आठ दिवसांत चौकशी पूर्ण होऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर वनमंत्र्याच्या दालनात उपोषण करण्याचा इशारा आमदार लंके विधानसभेच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला. जिल्हास्तरीय बिगर आदिवासी योजनेअंतर्गत वन विभागामार्फत पारनेर तालुक्यात राबवण्यात आलेल्या मृद व जलसंधारणाच्या कामात मोठा गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार आमदार लंके यांनी १३ मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपवनसंरक्षक स्वाती माने यांनी आमदार लंके यांच्यासह गैरव्यवहार झाला असल्याचा संशय असणाऱ्या बंधाऱ्यांची पाहणी केली. पाहणी दरम्यान, सहायक उपवनसंरक्षक रमेश देवखिळे व प्रभारी वनक्षेत्रपाल प्रताप जगताप यांनी आमदार लंके यांनी मागणी केलेली कागदपत्रे सादर करण्यास असमर्थता दर्शवली. पाहणी दरम्यान सुरू असलेली अधिकाऱ्यांची मनमानी व उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने संतप्त झालेल्या आमदार लंके यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी झालेल्या संतापाला आमदार लंके यांनी विधानसभेत वाट मोकळी करून दिली. सहायक उपवनसंरक्षक गेले सोळा वर्षे नगर जिल्ह्यातच कार्यरत आहेत. अनेक तक्रारी असूनही कारवाई तर दूरच त्यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली नाही ही बाब आमदार लंके विधीमंडळाच्या निदर्शनास आणून दिली. देवखिळे दोन महिन्यांनी, मे महिन्यात निवृत्त होणार आहेत. गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांचे वेतन, निवृत्तीनंतरचे आर्थिक व इतर लाभ रोखावेत, अशी मागणी आमदार लंके यांनी लक्षवेधी सूचना मांडताना केली.

सरकार अडचणीत आणण्याच्या चर्चेला काही अर्थ नाही
अधिकारी जलसंधारणाच्या कामात गैरव्यवहार करतात. त्यामुळे अपेक्षित परिणाम साध्य होत नाही. जिल्हा उपवनसंरक्षक देवखिळे यांच्या विरोधात यापूर्वीही आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. सत्ताधारी आमदारांकडूनच सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चेला काही अर्थ नाही. वन विभागातील अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरव्यवहाराची चौकशीची मागणी करणे म्हणजे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हणणे चुकीचे आहे. '' नीलेश लंके, आमदार.

बातम्या आणखी आहेत...