आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी विद्यापीठ:...तर कृषी विद्यापीठ नेमके कुणासाठी शेतकऱ्यांचा सवाल

राहुरी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परीक्षा जवळ आलेल्या असतानाच राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील शासकीय महाविद्यालयात कृषी पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षा व कृषी पदवीच्या अभ्यासासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना विद्यापीठाच्या वसतिगृहातून बाहेर काढण्याची प्रशासनाची भूमिका चर्चेची व तेवढीच वादग्रस्त ठरत आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना कृषी विद्यापीठात जागा नसेल, तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ कुणासाठी आहे, असा सवाल शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

पंधरवाड्यापूर्वी ठरावीक विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील वसतिगृहात आमच्या शिवाय कुणालाही वास्तव्य करता येणार नाही, अशी घेतलेली भूमिका वादाला तोंड फोडणारी ठरली होती. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात स्पर्धा परीक्षा तसेच कृषी पदवी अभ्यासासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मुलांचे वास्तव्य आहे. यामध्ये राहुरीसह पुणे, धुळे, कोल्हापूर येथील शासकीय महाविद्यालयात कृषी पदवी तसेच कृषी पदव्युत्तर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कृषी विद्यापीठ उभारणीसाठी जमिनी देऊन त्याग केलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांची मुले देखील स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी कृषी विद्यापीठात येत आहेत.

आर्थिक परस्थिती हलाखीची असल्याने पुण्यासारख्या मोठ्या व महागड्या शहरात स्पर्धा परीक्षेचा सराव करणे या मुलांच्या अवाक्याबाहेर आहे. राहुरी कृषी विद्यापीठात राहण्याची तसेच जेवणाची कायमच अबळ असताना अधिकारी बनण्याचे ध्येय बाळगून हालअपेष्टा सहन करत परीक्षेची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना कृषी विद्यापीठात वास्तव्यास जागा नसेल, तर शिक्षण, संशोधन व विस्तार या गोंडस नावाखाली चालणारे महात्मा फुले कृषी विद्यापीठ नेमके कुणासाठी? असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून केला जात आहे. कोरोनाच्या महामारीमुळे गेली दोन वर्ष स्पर्धा परीक्षा झालेल्या नाहीत. अशाही परिस्थितीत या मुलांनी जिद्द सोडलेली नाही. २०२२ अखेर स्पर्धा परीक्षा जवळ आलेल्या असल्याने ही मुले रात्रंदिवस अभ्यासात व्यस्त आहेत. अशा वेळेत विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाच्या परिसरातून बाहेर काढले जाते, ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने दुर्दैवी आहे.

परीक्षेच्या वेळी कारवाई
पुणे, धुळे, कोल्हापूर येथील शासकीय महाविद्यालयात कृषी पदवी व कृषी पदव्युत्तर पास झालेले तसेच राहुरी कृषी विद्यापीठात कृषी पदव्युत्तर पास झालेले विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेनिमित्त कृषी विद्यापीठात वास्तव्य होते. मात्र हक्काचे कृषी विद्यापीठ असताना या विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या वेळेत विद्यापीठ परिसरातून बाहेर काढण्याचे झालेले काम गालबोट लावणारे ठरले.

बातम्या आणखी आहेत...