आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:सामाजिक न्याय भवनाला मिळेना भोगवटा प्रमाणपत्र; रखडला 6 महामंडळांचा प्रवेश

बंडू पवार | नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरातील सामाजिक न्याय भवनाचे बांधकाम पूर्ण होऊन आठ महिने उलटून गेले अाहेत. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सामाजिक न्याय विभागाला “भोगवटा’ प्रमाणपत्र मिळत नसल्याने सहा विविध महामंडळाचा न्यायभवनातील प्रवेश रखडला आहे. दरम्यान, भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच मंत्रालयातून सामाजिक न्याय भवनाच्या उद्घाटनाचा मुहूर्त काढला जाणार आहे.

तत्कालीन भाजप-शिवसेना युतीच्या कार्यकाळात तत्कालीन जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रयत्नातून व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून १४ कोटी रुपये खर्च करून नगर शहरातील सावेडी नाका येथील दीड एकर जागेत उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाची इमारत जानेवारी महिन्यातच पूर्ण झाली आहे. या सामाजिक न्याय भवनात दिव्यांग महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, इतर मागास वर्ग महामंडळ, संत रोहिदास महाराज महामंडळ व जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समितीचे कार्यालय व सहाय्यक जिल्हा समाज कल्याण आयुक्त कार्यालय एकाच छताखाली येणार आहेत.

सामाजिक न्यायभवनाची इमारत पूर्ण होऊन रंगरंगोटी, वीज, पाणी, व अधिकाऱ्यांच्या व महामंडळाच्या दालनाबाहेर फलके देखील लावण्यात आली आहे. सामाजिक न्याय भवनाच्या उद्घाटनासाठी यापूर्वी तीन वेळा मुहूर्त काढले गेले, मात्र महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना वेळ न मिळाल्याने हे मुहूर्त लांबणीवर पडले होते. सामाजिक न्याय भवनाची इमारत पूर्ण होऊन आठ महिने झाले आहेत.या इमारतीचे काम सार्वजनिक विभागाकडून करण्यात आले आहे. इमारत पूर्ण झाल्यानंतर ही इमारत वापरण्यासाठी भोगवटा प्रमाणपत्र दिले जाते.

हे भोगवटा प्रमाणपत्र महापालिका प्रशासनाकडून देण्यात येते. भोगवटा प्रमाणपत्र घेण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. मात्र गेल्या आठ महिन्यापासून सामाजिक न्याय विभागाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भोगावठा प्रमाणपत्राची प्रतीक्षा लागलेली आहे.

उद्घाटनाचा मुहूर्त मंत्रालयातून निघेल
कोट्यवधी रुपये खर्च करून सावेडी नाका येथे तयार करण्यात आलेली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाची इमारत तयार झाली असून, सर्व महामंडळांची व अधिकाऱ्यांची दालने नावांसह सज्ज झाली असली तरी ग्राम विकास आघाडीतील मंत्र्यांना सामाजिक न्याय भवनाच्या उद्घाटनासाठी सवड मिळत नव्हती. आता नव्या सरकारकडून त्यांच्या कालावधीत सुरू झालेला प्रकल्पांचा आढावा घेण्याचे काम सुरू असून, भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मंत्रालयस्तरावरून उद्घाटनाचा मुहूर्त काढण्यात येणार आहे.

न्याय भवनातील जात पडताळणी कार्यालयासमोर लावला जेसीबी
सामाजिक न्याय भवनाची इमारत पूर्ण होऊन आठ महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. विशेष म्हणजे ज्या सामाजिक न्याय विभागाकडून ही इमारत उभारली जात आहे. त्या सामाजिक न्याय विभागाला इमारत पूर्ण होऊनही भाडेतत्त्वावर कार्यालय घेऊन कामकाज करावे लागत आहे. अशीच परिस्थिती अन्य महामंडळाची देखील आहे. विशेष म्हणजे सामाजिक न्यायभवनातील जात पडताळणी कार्यालयासमोर चक्क पाऊस लागू नये म्हणून जेसीबी लावण्यात आला. अधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

बातम्या आणखी आहेत...