आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साह:गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सामाजिक संस्थाही राहणार दक्ष; चाईल्डलाईन संस्था घेणार बालकांची काळजी

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आज होत असलेल्या शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीत भक्तांच्या सोयीसाठी आणि सेवेसाठी काही सामाजिक संस्था पुढे सरसावले आहेत. या मिरवणुकीत गणेश भक्तांचे हाल होऊ नयेत यासाठी, काही स्वयंसेवी संस्थांनी जबाबदारी स्वीकारली आहे. विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी भिंगार उपनगर तसेच ग्रामीण भागातूनही अबालवृद्ध येत असतात. त्यांची हेळसांड होऊ नये, ऐनवेळी मदत लागली तर काय करावे, यासाठी काही स्वयंसेवी संस्था दक्ष राहणार आहेत.

गणेश विसर्जन मिरवणुकीत पाहायला येणारे लहान बालके पालकांपासून हरवू नयेत, यासाठी चाईल्डलाईन स्वयंसेवी संस्था दक्ष असणार आहे. चाईल्डलाईन संस्थेचे केंद्रप्रमुख महेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली दहा जणांचे पथक विसर्जन मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी निगराणी ठेवणार आहे. विसर्जन मिरवणुकीत पालकांसोबत आलेली लहान बालके हरवल्यास तात्काळ चाईल्डलाईन संस्थेच्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर, तसेच विसर्जन मिरवणुकीसाठी बंदोबस्ताला नेमलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर जय आनंद महावीर युवक मंडळाच्या वतीने गणेश भक्तांचे आणि मंडळांचे स्वागत करण्यात येणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मुख्य मार्गावरुन ग्रामदैवत विशाल गणेश, तसेच इतर १५ ते १६ मानाची मंडळे विसर्जनाला जाणार आहेत. त्यामुळे या मिरवणूक मार्गावर यंदा आकर्षक रांगोळी देखील काढली जाणार आहे. चौकाचौकात काही गणेश मंडळांची आरती व पूजा केली जाणार आहे.

पत्रकार संघटनाही दक्ष
गणेश विसर्जन मिरवणुकीचे वार्तांकन करण्यासाठी येणाऱ्या पत्रकार बांधवांच्या मदतीसाठी मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख व सहकारी प्रयत्नशील असतात. यंदाही ते आपल्या सहकाऱ्यांसह पत्रकार बांधवांसाठी तसेच गणेशभक्तांसाठी दक्ष राहणार आहेत.

शांतता कमिटीही दक्ष
गणेश विसर्जन मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस प्रशासन दक्ष राहणार आहे. त्यांच्यासह मिरवणुकीत सलोखा कायम अबाधित राहावा, यासाठी शांतता कमिटीचे सदस्य देखील प्रयत्नशील राहणार आहेत.

महिलांनी काळजी घ्यावी
गणेश विसर्जन मिरवणुक पहायला येणाऱ्या महिला व युवतींनी काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. मिरवणूक पहायला येणाऱ्या महिला व युवतींच्या मदतीसाठी तसेच सुरक्षेसाठी शांतता कमिटी दक्ष राहणार आहे, असे सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...