आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामाजिक कार्यकर्त्या रेखा हजारे यांची हत्या करण्यासाठी आणखी काही लोकांनी मदत केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बोठे याची अधिक चौकशी करण्यासाठी त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी तपास अधिकारी अजित पाटील यांनी शनिवारी पारनेर न्यायालयासमोर केली. न्यायालयाने बोठेच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ केली आहे. पारनेर न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायाधीश उमा बोऱ्हाडे यांच्यासमोर बोठे याला हजर करण्यात आले होते. तपास अधिकारी अजित पाटील यांनी या वेळी बाजू मांडताना न्यायालयापुढे विविध मुद्दे उपस्थित केले. घटनेच्या दिवशी व दुसऱ्या दिवशी बोठे याने कोणते फोन नंबर वापरले, त्यास इतर कोणी मदत केली आहे का, बोठे याने काही लोकांना पत्रे लिहिली आहेत, काहींना ती पाठवलीही आहेत. काही पत्रे तपासात हस्तगत करण्यात आली आहेत.
त्याने पाठवलेल्या पत्रांमध्ये काय मजकूर होता, २४ नोव्हेंबर व ३० नोहेंबर रोजी मृत रेखा जरे यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी बोठे याने काही लोकांना पाळतीवर ठेवले असण्याची शक्यता आहे. अशा लोकांची नावे निष्पन्न करायची आहेत. त्यासाठी बोठेच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ करावी, अशी मागणी पाटील यांनी केली. आरोपी बोठे १२ डिसेंबर रोजी हैदराबाद येथे पोहोचल्याचे सांगत आहे. तोपर्यंत त्याचे वास्तव्य कोठे होते, फरार असताना त्याने वापरलेले वाहन जप्त करायचे आहे. मृत रेखा जरे व बोठे यांच्यात काही आर्थिक व्यवहार होते का, बोठे याने जरे यांच्या हत्येची १२ लाख रुपयांना सुपारी दिली होती. ही रक्कम बोठे याने कशी उभी केली, हैदराबादमधील एक महिला आरोपी फरार आहे, या महिलेचाही शोध घेणे बाकी आहे आदी कारणांसाठी बोठे याच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्याची मागणी पाटील यांनी न्यायालयाकडे केली.
तपासात अजूनही काहीच निष्पन्न झाले नाही
सात दिवस पोलिस कोठडी मिळूनही तपासात काहीही प्रगती झालेली नाही. १३ मार्चला सादर करण्यात आलेला रिमांड रिपोर्ट व आज सादर करण्यात आलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये काहीही बदल नाही, असा युक्तिवाद बोठे याचे वकील महेश तवले यांनी न्यायालयासमोर केला. गुन्ह्यासंदर्भात काय प्रगती झाली हे सांगण्याऐवजी तपासी अधिकारी गुन्ह्याशी संबंध नसलेल्या बाबींचा संदर्भ देत तपासात प्रगती झाल्याचे सांगत असल्याचेही तवले यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.