आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकरी साक्षरता हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या दैठणे गुंजाळ (ता. पारनेर) येथील ‘बायोमी टेक्नॉलॉजीज् प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सॉईलोमीटर कीट हे अभिनव उपकरण तयार केले आहे. शेतीतील मातीचा जिवंतपणा तपासणी व त्यानुसार कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याच्या ट्रिक्स शिकवण्याचे काम ‘बायोमी’तर्फे केले जाते.
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते सॉईलोमीटर किटचे लोकार्पण जयपूर (राजस्थान) येथे करण्यात आले. जयपूर येथील चौधरी चरणसिंग राष्ट्रीय कृषी विपणन संस्थेच्या चौथ्या पदवीदान समारंभात या कीटचे लोकार्पण झाले. कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्यासह केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, खासदार कर्नल राज्यवर्धनसिंग राठोड, रामचंद्र बोहरा, कृषी कल्याण मंत्रालयाचे सहसचिव डॉ. विजया लक्ष्मी, प्रधान सचिव दिनेश कुमार आदी उपस्थित होते. बांधावरची प्रयोगशाळा उभारणी करण्याच्या संकल्पाने प्रेरित होऊन काम करणाऱ्या ‘बायोमी’चे संचालक डॉ. प्रफुल्ल गाडगे यांच्या कृषी संशोधन कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले. डॉ. गाडगे म्हणाले, की ‘बायोमी’ हे नगर येथील स्टार्टअप असून, चौधरी चरण सिंग राष्ट्रीय कृषी विपणन संस्थेच्या राष्ट्रीय कृषी विस्तार योजनेंतर्गत ‘इनक्युबेटेड’ आहे. कृषिमंत्री आणि कृषी कल्याण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली कौतुकाची थाप खूप मोलाची आहे. आतापर्यंत आमची टीम आणि आम्ही हजारो शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च कमी करून उत्पादनवाढीसह सेंद्रिय आणि विषमुक्त शेतीसाठी काम करीत आहोत. त्याचे कौतुक झाल्याने शेती क्षेत्रात आणखी जोमाने काम करण्याची ऊर्मी मिळाल्याचे ते म्हणाले.
डॉ. गाडगे म्हणाले, की देशातली पहिली मातीचा जिवंतपणा म्हणजेच मातीतील पिकांना उपयोगी सूक्ष्मजीवांचे प्रमाण प्रत्यक्ष बांधावर शेतकऱ्यांना सांगणारी, अशी ही सॉईलोमीटर किट आहे. प्रत्यक्षात प्रयोगशाळेत तपासणीसाठी तब्बल तीन दिवस आणि १० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, सॉईलोमीटर कीटच्या मदतीने फक्त ३१० रुपयांत व ३ तासांत मातीचे परीक्षण करू शकतो. या कीटच्या माध्यमातून जिवाणू खते आणि जैविक कीटकनाशकांचा दर्जाही शेतकऱ्यांना घरच्या घरी तपासता येतो. त्यामुळे उच्च दर्जाच्या जैविक कृषी निविष्ठा शेतात वापरण्यास मदत होईल आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.