आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमय्या काॅलेजचा परप्युच्यूअल विद्यापीठाशी सामंजस्य करार:शैक्षणिक व संशोधनात्मक उपक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणार- डाॅ. रिनो आर. रेयल

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव येथील के. जे. सोमय्या महाविद्यालयाशी झालेल्या सामंजस्य करारामुळे शैक्षणिक, संशोधनात्मक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यास मदत होईल. लवकरच आम्ही सोमय्या महाविद्यालयाला शैक्षणिक भेट देणार आहोत. तेथील व्यवस्थापन, प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी यांच्याशी सुसंवाद साधणार आहाेत, असे प्रतिपादन फिलिपिन्समधील परप्युच्यूअल हेल्प सिस्टीम डाल्टा मोलिनो विद्यापीठाचे स्कूल डायरेक्टर डॉ. रिनो आर. रेयल यांनी केले.

के. जे. सोमय्या (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात फिलिपिन्समधील परप्युच्यूअल हेल्प सिस्टीम डाल्टा मोलिनो विद्यापीठाशी सामंजस्य करार ऑनलाईन पद्धतीने मंगळवारी करण्यात आला. यावेळी ते बाेलत हाेते. या कराबाबत साेमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी माहिती दिली.

प्राचार्य डॉ. यादव म्हणाले, या सामंजस्य कराराच्या अंतर्गत दोन्ही शैक्षणिक संस्थांच्या दरम्यान स्टुडन्ट एक्सचेंज, फॅकल्टी एक्स्चेंज, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे व परिसंवाद, संशोधनाचे विविध उपक्रम तसेच सांस्कृतिक आदान-प्रदान यास चालना मिळणार आहे. कोपरगावसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शैक्षणिक उपक्रमात या करारामुळे सहभाग घेता येईल. विद्यार्थ्यांबरोबरच संस्थेतील प्राध्यापकांनाही या विद्यापीठात अध्ययन-अध्यापन, संशोधन यामध्ये सहभागी होता येईल.

या सामंजस्य करारावेळी परप्युच्यूअल विद्यापीठ फिलिपिन्सचे अध्यक्ष डॉ. अन्थोंनी जोस एम. तमायों, स्कूल डायरेक्टर डॉ. रिनो आर. रेयल, कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीचे डीन व सामंजस्य कराराचे समन्वयक डॉ. पास्टर अरग्युलस ज्यु, प्राध्यापिका मिरा रामीरेझ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस.यादव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. विजय ठाणगे, सामंजस्य कराराचे समन्वयक डॉ. रवींद्र जाधव व प्रबंधक डॉ. अभिजीत नाईकवाडे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात दोन्ही देशांच्या राष्ट्रगीत गायनाने झाली. कार्यक्रमाच्या समारोपात परप्युच्यूअल विद्यापीठातील या कराराचे समन्वयक डॉ. पास्टर आरग्युलस ज्यू म्हणाले, या सामंजस्य करारामुळे अंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, शोधनिबंध, संशोधन प्रकल्प व अंतरराष्ट्रीय व्याख्यानमालेचे आयोजन पुढील काळात करण्यात येईल. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांनी हा सामंजस्य करार महाविद्यालयाची मोठी उपलब्धी असल्याचे नमूद केले. संस्थेचे सचिव अॅड. संजीव कुलकर्णी व विश्वस्त संदीप रोहमारे यांनी सामंजस्य कराराबद्दल समाधान व्यक्त केले. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. विजय ठाणगे यांनी आभार मानले.

यापूर्वी मलेशियातील विद्यापीठाशी करार

सोमय्या महाविद्यालयाचे सामंजस्य कराराचे महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. रवींद्र जाधव यांनी या कराराद्वारे महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सांस्कृतिक आदान-प्रदान करण्याची संधी निर्माण होणार आहे. महाविद्यालयाने नुकतेच जुलै महिन्यात मलेशियातील यूआयटीएममारा विद्यापीठाशी यशस्वी सामंजस्य करार केला आहे, असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...