आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:प्रमुख रस्त्यांच्या कामाला गती द्यावी ; कदम‎

नगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मोठ्या प्रमाणात वाहतूक‎ व रहदारी असणाऱ्या प्रमुख रस्त्यांची‎ कामे अत्यंत संथगतीने सुरू आहेत.‎ मध्यवर्ती शहरात माळीवाडा‎ बसस्थानकाजवळील माळीवाडा‎ वेस ते मार्केटयार्ड चौक, पुणे‎ बसस्थानक स्वस्तिक चौक ते टिळक‎ रोड, वाडीया पार्क, आयुर्वेद‎ चौकापर्यंत, तसेच आनंदधाम रस्ता‎ या तीन प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण‎ सध्या सुरू आहे. गेल्या दोन ते तीन‎ महिन्यांपासून ही कामे अत्यंत‎ संथगतीने सुरू असून, निम्मे रस्ते‎ वाहतुकीसाठी बंद आहेत.

त्यामुळे‎ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर‎ वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा‎ लागत आहे. या रस्त्यांच्या कामांना‎ गती द्यावी, कामांचा दर्जा तपासावा,‎ अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख‎ संभाजी कदम यांनी केली आहे.‎

कदम यांनी म्हटले की,‎ ठेकेदाराकडून अत्यंत संथगतीने काम‎ सुरू असताना महापालिकेचे‎ अधिकारी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष‎ करीत आहेत. वास्तविक,‎ ठेकेदाराकडून पाठपुरावा करून कामे‎ वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजन करणे‎ आवश्यक होते. मात्र, तसे कुठलेही‎ नियोजन होताना दिसत नाही. या‎ रस्त्यांच्या कामांचे श्रेय घेणाऱ्यांनाही‎ नागरीकांना होणारा त्रास दिसत नाही‎ का, असा सवाल उपस्थित होत आहे.‎ रस्त्यांची कामे हाती घेण्यापूर्वी‎ तेथील ड्रेनेजलाईनची कामे करण्यात‎ आली होती. मात्र, ही कामे करताना‎ तेथील जलवाहिन्यांच्या कामांकडे‎ दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे कामे‎ करताना जलवाहिन्यांची तुटफूट‎ होऊन परिसरातील रहिवाशांची‎ गैरसोय होते. ठेकेदाराने ही दुरुस्तीची‎ कामे तातडीने करणे गरजेचे आहे.‎

मात्र, त्यावरूनही प्रशासनात‎ टोलवाटोलवी केली जात आहे.‎ जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला‎ जात आहे. त्यामुळे आयुक्तांनी याची‎ गंभीर दखल घेऊन संथगतीने कामे‎ करणाऱ्या ठेकेदारांना समज द्यावी.‎ कालबध्द नियोजन करून अडथळे दूर‎ करावेत व लवकरात लवकर काम पूर्ण‎ करावे. ठेकेदार प्रतिसाद देत नसतील,‎ तर त्यांच्यावर कारवाई सुरू करावी,‎ असे त्यांनी म्हटले आहे.‎

दरम्यान, काही रस्त्यांना कामे पूर्ण‎ होण्यापूर्वीच तडे जाण्यास सुरुवात‎ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे‎ कामासाठी वापरल्या जाणाऱ्या‎ साहित्याचा दर्जाही तपासावा. वेळीच‎ दखल न घेतल्यास कोट्यवधी‎ रुपयांचा निधी वाया जाण्याची शक्यता‎ आहे. तसे झाल्यास याला सर्वस्वी‎ महापालिका प्रशासन जबाबदार‎ राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...