आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार आशुतोष काळेंच्या पशुसंवर्धन विभागाला सूचना:लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांच्या लसीकरणाचा वेग वाढवा

अहमदनगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील विविध भागांसह कोपरगाव तालुक्यात अनेक जनावरांना लम्पी स्किन सदृश्य आजाराची लागण झाली आहे. या रोगाचा प्रादुर्भाव जनावरांच्या आरोग्यासाठी हानिकारक असून वेळप्रसंगी जनावरांचा जीव जाण्याचा धोका निर्माण झाला असून काही जनावरे या आजारामुळे मृत्यूमुखी पडली आहेत. याची गांभीर्याने दखल घेऊन पशुसंवर्धन विभागाने जनावरांच्या लसीकरणाचा वेग वाढवावा, अशा सूचना श्रीसाईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे यांनी पशु संवर्धन विभागाला दिल्या आहेत.

मागील काही दिवसांत जिल्ह्यासह कोपरगाव तालुक्यातील काही गावांमध्ये जनावरांना लम्पी स्किन सदृश रोगाचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर साई संस्थाचे अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे यांनी बुधवारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी त्यांनी परिस्थिती जाणून घेत करावयाच्या उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. अजयनाथ थोरे, कोपरगाव पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी डॉ. श्रद्धा काटे, डॉ. दिलीप जामदार आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले की, कोपरगाव तालुक्यातील काकडी गावातील काही जनावरांमध्ये लम्पी रोगाचे विषाणू आढळून आले आहेत. लम्पी स्किन आजारामुळे जनावरांची प्रतिकार शक्ती कमी होऊन जनावरांना अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे ज्या जनावरांमध्ये लम्पी स्किन सदृश आजाराचे लक्षण दिसत आहेत, अशा जनावरांचे व त्या गावातील व परिसरातील सर्वच जनावरांचे लसीकरण करण्यावर भर द्यावा. जेणेकरून जनावरांमध्ये या आजाराची व्याप्ती वाढणार नाही. लम्पी आजारावर लवकर नियंत्रण मिळविणे शक्य होईल. लम्पी स्किन रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व शेतकऱ्यांचे पशूधन वाचवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. शेतकऱ्यांनी देखील पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून ज्या जनावरांमध्ये लम्पी स्किन सदृश्य रोगाचे लक्षण दिसत असल्यास त्या जनावरांचा इतर जनावरांशी संपर्क येऊ न देता योग्य काळजी घ्यावी. तसेच जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन साई संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे यांनी केले.

नेवासेत 16 जनावरे आढळली

नेवासे तालुक्यात गळनिंब, गोगलगाव, नेवासे बुद्रुक, देवसडे, तेलकुडगाव, लेकुरवाळी, आकडा आदी गावांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झालेली 16 जनावरे आढळली आहेत. या जनावरांना लम्पी रोगाची लागण झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. या गावच्या पाच किलोमीटर परिसरात असलेल्या जनावरांचे शंभर टक्के लसीकरण करण्याचा प्रयत्न प्रशासन करणार आहे. नेवासे तालुक्यात एकूण १ लाख ५२ हजार जनावरे आहेत. या सर्वांचे लसीकरण करण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...