आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:दर्जाहीन रस्ता कामाच्या विरोधात आप चे रास्ता रोको

नेवासे7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे ते टाकळीभान रस्ता काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. हे काम अंदाज पत्रकाप्रमाणे होऊन सुरु असलेल्या कामाची गुणवत्ता तपासणी करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता नेवासे फाटा येथील आंबेडकर चौकात आपचे तालुकाध्यक्ष राजू आघाव व निवडणूक समिती प्रमुख अॅड.सादिक शिलेदार यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आपचे तालुकाध्यक्ष आघाव म्हणाले,शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा करुन बांधकाम खात्याचे या रस्ता कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. ठेकेदार निकृष्ट काम करत आहे. एका कि.मी अंतराला अडीच कोटी रुपये खर्च होऊनही या कामाची गुणवत्ता नाही.अॅड.शिलेदार यांनी कामाचे अंदाजपत्रक आणि सुरु असलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. काम अंदाज पत्रकाप्रमाणे न झाल्यास प्रसंगी न्यायालयातही दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला. तालुका उपाध्यक्ष देवराम सरोदे म्हणाले, तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांपासून राजकिय नेतेमंडळी रस्ता कामासंदर्भात आवाज उठवत असताना याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे शंका उपस्थित होत आहे. काम नियोजित अंदाजपत्रकाप्रमाणे न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

निवेदन बांधकाम खात्याचे अभियंता दुबाळे यांनी स्वीकारुन या कामाची गुणवत्ता तपासणीसाठी पाठपुरावा करु व सुरु असलेले काम दर्जेदार होण्यासाठी बांधकाम विभाग लक्ष घालणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. आंदोलनात घटनापती युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रवि भालेराव, आम आदमीचे सचिव प्रविण तिरेडकर, भाऊसाहेब बेल्हकर,अप्पासाहेब लोंढे, अल्पसंख्याक आघाडी प्रमुख सलीम सय्यद, शहराध्यक्ष संदीप आलवणे,बापूसाहेब आढागळे,नानासाहेब बर्डे, डॅनियल जावळे, संतोष कापसे, पांडुरंग खंडागळे, नितीन गुंजाळ, युवक आघाडी प्रमुख दीपक गायकवाड,सोहेल शेख आदी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...