आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संताप:तपोवनसह 44 गावांसाठीची बुऱ्हाणनगर पाणी योजना सुरू करा अन्यथा आंदोलन; माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचा इशारा

नगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातत्याने कुठल्या ना कुठल्या कारणाने बंद होत असलेली तपोवनसह ४४ गावांसाठी असलेली बुऱ्हाणनगर पाणीपुरवठा योजना गेल्या चार दिवसापासून पुन्हा बंद झाली आहे. तातडीने ही पाणीपुरवठा योजना सुरू करा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना भेटून दिलेल्या निवेदनात दिला आहे.

नगर शहराजवळील तपोवन रोडसह ४४ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या बुऱ्हाणनगर पाणी योजनेची मुख्य जलवाहिनी सोमवारी सकाळी फुटली. त्यामुळे या योजनेवर अवलंबून असलेल्या १ लाख नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ही पाणी योजना बंद पडल्याने माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जेऊर, पिंपरी घुमट, पोखर्डी, पिंपळगाव माळवी ,वाटेफळ, डोंगरगण, शेंडी, दरेवाडी सह ४४ गावातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेतली.

ही योजना तातडीने सुरु करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा कर्डिले यांनी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.या योजनेवर ४४ गावे पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबुन आहेत.गेल्या दोन ते अडीच वर्षांत अनेकदा ही योजना बंद पडल्यामुळे सर्वसामान्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही, असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिभाऊ कर्डिले, रेवणनाथ चोभे, रभाजी सूळ, गणेश पवार, रितेश पवार, दशरथ रोपटे, राधिका प्रभूने, बापूसाहेब बेरड, बाबासाहेब अमृते, बाबासाहेब कोळेकर , कैलास पठारे, संपत निमसे, सय्यद रईस,सुरेश वारुळे ,सिताराम दाणी, आदेश भगत, रावसाहेब कर्डिले, सुनील नरवडे, संतोष कुलट, दिलीप भालसिंग आदी यावेळी उपस्थित होते.

ग्रामस्थांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागते
बुऱ्हाणनगर पाणी योजना बंद झाल्यानंतर या योजनेवर अवलंबून असलेल्या 44 गावांमधील ग्रामस्थांच्या आक्रोशाला स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामोरे जावे लागते. अनेकदा या पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडीत केल्यानंतर ही योजना बंद पडते. ग्रामपंचायतीने बिले भरल्यानंतर पुन्हा ही योजना सुरू होते. असे शिवाजी कर्डिले यांनी सांगितले.

बैठक घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून तातडीने या पाणी योजनेवर तोडगा काढावा तसेच गॅस व अन्य पाईपलाईनची विस्तृत माहिती मला द्यावी, अशी सूचना दिली. या पाणी योजनेबाबत लवकरात लवकर बैठक घेऊ,असे आश्वासन डॉ.भोसले यांनी शिष्टमंडळाला दिली.

बातम्या आणखी आहेत...