आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृत महोत्सव:पोलिस मुख्यालय मैदानावर ध्वजारोहण प्रसंगी महसूल मंत्री विखे यांचे प्रतिपादन

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याचा ७५ वर्षांचा कालखंड खूप मोठा आहे. या स्वातंत्र्य लढ्यात अनेक महापुरुषांचे योगदान लाभले आहे. नगर जिल्ह्याचे स्वातंत्र्य लढ्यात लक्षणीय योगदान आहे. येथील भूईकोट किल्ला त्याचा साक्षीदार आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. ध्वजारोहणानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

मंत्री विखे म्हणाले, विविध उपक्रमांद्वारे भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरु आहे. याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या ‘सबका साथ सबका विकास’ या संकल्पनेतून बलशाली भारताची निर्मिती होणार आहे. पंतप्रधानांच्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाने संपूर्ण देश मंत्रमुग्ध झाला आहे. नागरिकांमध्ये चैतन्य आणि ऊर्जा निर्माण झाली आहे. सर्व घरांवर डौलाने फडकणारा भारतीय ध्वज बघून ‘हर मन तिरंगा’ अशी भावना निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले.

विविध स्टार्टअप योजनांद्वारे महाराष्ट्र राज्याला देशामध्ये अग्रगण्य राज्य करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संकल्पनेला नाग‍रिकांनी साथ द्यावी. गत काळात आलेल्या कोविड संकटात अनेक व्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचे आपण अनुभवले आहे. उद्योग, रोजगार, व्यापार, शैक्षणिक संस्था, आरोग्य विभाग आणि जनतेला या संकटाचा सामना करावा लागला. या संकटात जिल्हा प्रशासनाबरोबरच आरोग्य सेविका, आशा सेविका आणि आरोग्य दूत यांनी उल्लेखनीय कार्य केले असून त्यांच्या कार्याचाही मंत्री विखे यांनी यावेळी गौरव केला.

या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात स्वातंत्र सैनिक, शहिद सैनिकांचे कुटूंबीय, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सोनप्पा यमगर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित, स्थानिक लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारीयावेळी उपस्थित होते.

पुरस्कारप्राप्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान
जिल्हा व पोलिस प्रशासनातील विविध अधिकारी, कर्मचारी तसेच शालेय स्तरावर विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी विखे यांनी संवाद साधला.

भुईकोट किल्ल्याला दिली भेट
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात लक्षणीय योगदानाचे प्रतिक असलेल्या येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी भेट देऊन तेथील परिसराची पाहणी केली. भुईकोट किल्ला परिसरात पर्यटनवृध्दीसाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला यावेळी दिल्या.

बातम्या आणखी आहेत...