आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील सोनेवाडी शिवारात गेल्या महिन्यापासून विद्युत मोटार चोरांचा सुळसुळाट झाला असून अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी या चोरांनी चोरून नेल्या आहेत त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या चोरांचा कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. गुरुवारी रात्री सोनेवाडी शिवारातील सर्वे नंबर २५२/५ या क्षेत्रातील अप्पासाहेब कारभारी जावळे यांच्या विहिरीवरील टेक्समो कंपनीची साडेसात हाँस्पॉवरची विद्युत पानबुडी मोटार, नंबर फूट पाईप, सव्वाशे फूट केबल, स्टार्टर फ्युज व इतर अंदाजे ३५ हजारांच्या या विद्युत वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्या.
लाईटचा टाइमिंग सकाळी आठचा झाल्यामुळे विनायक अप्पासाहेब जावळे हे आपल्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले असता झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. आपल्या विहिरीवर सर्व साहित्याची चोरी झाली असल्याचे त्यांनी पाहिले. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना याबाबत त्यांनी कल्पना दिली असता अनेक शेतकऱ्यांनी आमच्या देखील मोटारी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी चोरी गेले असल्याचे सांगितले.
याबाबत काल अप्पासाहेब जावळे व विनायक जावळे यांनी कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनला फिर्याद दिली असून गावातील नागरिकांनाही सतर्क राहण्याचे त्यांनी सांगितले. हे विद्युत मोटर चोर मोटारी चोरून त्यातील तार काढून बाजारात विकून पैसे कमवत असल्याचा गोरख धंदा करत असल्याचे अनेकांनी सांगितले. मात्र यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी तत्काळ पैसे उपलब्ध करून विद्युत मोटारी खरेदी कराव्या लागत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले. या चोरांचा कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.