आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्यलढा आपण अभ्यासक्रमात शिकवितो, तो लढा पूर्ण झाला. मात्र, समतेची लढाई अद्यापही सुरु आहे. त्यामुळे इतिहास विषयात ‘समतेचा लढा’ हा अभ्यासक्रम शिकविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्य विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी केले.
नेवासे तालुक्तयातील रवडी येथे सत्यशोधक पत्रकार ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त दीक्षित यांच्या हस्ते पत्रकारिता व साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. पत्रकारितेचा पुरस्कार पत्रकार अभिजित कांबळे यांना, तर साहित्य पुरस्कार पत्रकार योगेश बिडवई यांना ‘कांद्याची रडकथा’ या पुस्तकासाठी प्रदान करण्यात आला.
दयाराम पाडलोस्कर (गोवा, ग्रंथ - बवाळ), प्रा. शिवाजीराव बागल (सोलापूर, ज्ञानमंदिरातील नंदादीप), डॉ. नारायण भोसले (मुंबई, देशोधडी), सारिका उबाळे (अमरावती, कथार्सिस), भारत सातपुते (लातूर, आम्ही फुले बोलतो), प्रा. वसंत गिरी (बुलढाणा, तरुणांचे आयडॉल सुभाषचंद्र बोस), डॉ. प्रतिभा सुरेश जाधव (नाशिक, अस्वस्थतेची डायरी), डॉ. तुकाराम रोंगटे (पुणे, आदिवासींचेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर), राकेश सांळुके (सातारा, दख्खण समृद्ध प्रवास), डॉ. शिवलिंग मेनकुदळे (पुणे, प्रबोधनाचा वसा आणि वारसा) यांना साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाला व्यासपीठावर माजी आमदार नरेंद्र घुले, मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे अध्यक्ष पांडुरंग अभंग, सचिव उत्तमराव पाटील, उपाध्यक्ष कॉ. बाबा अरगडे, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. श्रद्धा कुंभोजकर, पत्रकार सुधीर लंके, प्रकाश पाटील, ॲड. संभाजी बोरुडे आदी उपस्थिते होते.
दीक्षित यांनी आपल्या भाषणात मुकुंदराव पाटील यांच्या सत्यशोधक पत्रकारितेचा आढावा घेतला. ते म्हणाले, फुले यांच्या मृत्यूनंतर राज्याला चाळीस वर्षे त्यांचा विसर पडला होता. फुलेंमध्ये वैगुण्य नव्हते तर आपल्या दृष्टीत वैगुण्य होते. प्रबोधन परंपरेत सर्वांत जहाल, विद्रोही व बहुजनवादी चळवळ म्हणजे सत्यशोधक चळवळ आहे. ही वैश्विक चळवळ आहे.
मुकुंदराव पाटील यांनी तरवडीसारख्या खेड्यातून ‘दीनमित्र’ हे नियतकालिक चालवून ही चळवळ खेडोपाडी पोहोचली होती, हे दाखवून दिले. त्यांनी पत्रकारितेतून व साहित्यिक लेखनातून मूल्यांचा प्रसार केला. त्यांनी सत्यशोधक चळवळीला पुरोगामी हिंदुत्त्वाची व वारकरी परंपरेची जोड दिली. कांबळे म्हणाले, मुकुंदराव पाटील यांनी पत्रकारिता करताना नजर उघडी ठेवून सत्यशोधन केले. भूमिका घेतली व समस्यांचा पाठपुरावा केला. त्यांचे अनुकरण पत्रकारांनी केले तर हा स्तंभ लोकशाहीत चांगले काम करु शकेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.