आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाचनाने ज्ञान व शब्दसंपत्ती वृद्धिंगत होते म्हणून प्रत्येक शाळेत ग्रंथालय असावे, अशी शिक्षक,विद्यार्थी व पालकांची इच्छा असते. पण शाळेत ग्रंथालयासाठी स्वतंत्र खोली उपलब्ध करून देणे शक्य नसल्याने त्यावर उपाय म्हणून फिरते बालवाचनालय सुरू केले. हा अनोखा उपक्रम जामखेड तालुक्यातील नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेत राबवण्यात आला आहे.
प्रत्येक शाळेत ग्रंथालय असावं अशी सर्वांचीच इच्छा असते. पण जिल्हा परिषदेच्या शाळेत ग्रंथालयासाठी स्वतंत्र खोली उपलब्ध करून देणे शक्य होत नाही.तरीही काही शाळांनी ग्रंथालयासाठी स्वतंत्र कपाट वर्गात, कार्यालयात ठेवून तात्पुरती सोय केलेली आहे.
नायगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ग्रंथालयासाठी स्वतंत्र खोली उपलब्ध करून देणे शक्य नसल्याने त्यावर उपाय म्हणून शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र लव्हाळे, शिक्षक लक्ष्मीकांत ईडलवार, रामदास राजगीरवाड यांनी फिरते बालवाचनालय सुरू केले. या अनोख्या उपक्रमासाठी त्यांना केंद्रप्रमुख किसन वराट, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, गटविकास अधिकारी प्रकाशचंद्र पोळ यांचे मार्गदर्शन लाभले.
एका वर्गात ग्रंथालयासाठी आवश्यक पुस्तके ठेवण्यासाठी कपाट ठेवले व बैठक व्यवस्थेसाठी लहान मुलांच्या बेबी चेअर लोकसहभागातून उपलब्ध करून घेतल्या. यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आण्णासाहेब शिंदे व माजी सरपंच शिवाजी ससाणे यांनी आर्थिक मदत केली. यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादासाहेब काळदाते यांचे सहकार्य लाभले शाळेच्या मैदानावर खुर्च्या वर्तुळाकार ठेवून मध्यभागी मोठी छत्री ठेवली. ज्या वर्गातील विद्यार्थ्यांना वाचनालयातील पुस्तके वाचायची असतील ते मैदानात ठेवलेल्या खुर्च्यांवर बसून वाचन करतात. या शाळेत पहिली ते पाचवी पर्यंत विद्यार्थी आहेत. एका शिक्षकाकडे दोन वर्ग असल्याने एका वर्गाचे अध्यापन चालू असताना दुसऱ्या वर्गातील विद्यार्थी खुर्चीवर बसून वाचन आणि अभ्यास करतात, असा दुहेरी फायदा होत आहे. विद्यार्थीही खुर्च्यांवर बसून आनंदाने वाचन करत आहेत.
वाचनासाठी विद्यार्थी स्वयंप्रेरणेने बसतात
वाचनासाठी गोष्टींची पुस्तके, किशोर मासिके यांचा वापर केला जातो. हवेशीर बैठक व्यवस्था असल्याने विद्यार्थी वाचनासाठी स्वयंप्रेरणेने बसतात. खुर्च्या व छत्रीची रचना विद्यार्थी आवडीने हवी तेथे करतात, त्यामुळे हे वाचनालय विद्यार्थ्यांच्या आवडीचे ठरत आहे. हे वाचनालय सुरू करण्यामागे विद्यार्थ्यांत वाचनाची आवड निर्माण होणे, एकाग्रता व शब्दसंपत्तीत वाढ होणे हा उद्देश आहे, असे मुख्याध्यापक लव्हाळे, शिक्षक इडलवार व राजगिरवाड यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.