आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला जाणुया नदीला अभियान:नद्यांच्या समस्यांचा अभ्यास करुन त्यांची सोडवणूक करा; अपर जिल्हाधिकारी मापारी यांचे आवाहन

नगर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढते नागरीकरण आणि औद्योगिकरणामुळे नद्यांवर विपरित परिणाम होत आहेत. प्रदूषणाच्या वाढत्या समस्यांमुळे उपलब्ध भूपृष्ठजलाची उपयुक्तता घटत आहे. या सर्व बाबींचा विचार करता नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी ‘चला जाणुया नदीला’ हे अभियान नगर जिल्ह्यात लोकसहभागातून यशस्वी करा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी मंगळवारी केले.

‘चला जाणुया नदीला’ या अभियानासाठी नियुक्त जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीसाठी उपवनसंरक्षक सुवर्णा माने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनीलकुमार पठारे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, जिल्हा जलसंधारण अधिकारी ढोकपौळ, प्रदूषण नियंत्रण विभागाचे चंद्रकांत शिंदे, समन्वयक अजिनाथ ढाकणे, सुभाष देशमुख, विठ्ठल शेवाळे, संपत त्र्यंबकराव देशमुख आदी उपस्थित होते.

मापारी म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त २ ऑक्टोबर रोजी सेवाग्राम वर्धा येथून या अभियानाची सुरुवात झालेली आहे. नगर जिल्ह्यातील आढळा, अगस्ती, म्हाळुंगी नद्यांचा या अभियानात समावेश करण्यात आला आहे.

नद्यांविषयी सर्वसामान्यांसह विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण होण्याच्या दृष्टीने नद्यांच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांच्या सहलीच्या आयोजनाबरोबरच नद्यांवर आधारित निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. एनएसएस, एनसीसी विद्यार्थ्यांसाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात यावे. या अभियानामध्ये लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये स्वयंसेवी संस्थांसह, धार्मिक गुरुंची देखील महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

ही आहेत या अभियानाचे उद्दिष्ट्ये
नदी संवाद अभियानाचे आयोजन करणे, जनसामान्यांना नदीसाक्षर करण्याबाबत उपाययोजना आखणे, नागरिकांच्या सहकार्याने नदींचा सर्वंकष अभ्यास करणे व त्याबाबतचा प्रचार व प्रसार करणे, अमृत वाहिनी बनविण्यासाठी मसुदा तयार करणे, नदीचे स्वास्थ्य आणि मानवी आरोग्य याबबात प्रचार व प्रसार रुपरेषा आखणे, नदीचा तट, प्रवाह जैवविविधतेबाबत प्रत्येक जिल्ह्यात प्रचार, प्रसार याबाबत नियोजन करणे, पावसाचे पाणी योग्य जागी अडवून भूजल स्तर उंचावणे, जनजागृती करणे हे उद्दिष्टे आहेत.

बातम्या आणखी आहेत...