आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणीची दखल:लोकायुक्त कायद्यातील सुधारणा स्वीकारल्याने बारा वर्षांच्या तपश्चर्येस यश ; अण्णा हजारे

पारनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य मंत्रिमंडळाने लोकायुक्त कायद्यातील सुधारणा स्वीकारल्याने भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या बारा वर्षांच्या तपश्चर्येस यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. लोकायुक्त कायद्यात सुधारणा करून मुख्यमंत्र्यासह सर्वांनाच लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत समाविष्ट करावे, या मागणीसाठी हजारे यांनी २०१० सालापासून वेळोवेळी आंदोलने केली होती. हजारे यांच्या मागणीची दखल घेत तत्कालीन फडणवीस सरकारने २०१७ साली लोकायुक्त कायद्यात सुधारणा करण्यासाठी मसुदा समितीची स्थापना केली.

या समितीत हजारे यांच्यासह सनदी अधिकारी, विधीज्ञ, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. या समितीने तयार केलेला प्रस्तावित लोकायुक्त कायद्याचा मसुदा राज्य सरकारला गेल्या महिन्यात सादर केला. समितीने तयार केलेला मसुदा हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जसाच्या तसा स्वीकारण्यात आला. हिवाळी अधिवेशनात लोकायुक्त कायदा सुधारणा विधेयक विधीमंडळात मांडण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासंदर्भात हजारे यांनीमाधान व्यक्त केले.

ते म्हणाले, सुधारीत लोकायुक्त कायदा क्रांतीकारक आहे यात शंका नाही. पूर्वीचे लोकायुक्त नामधारी होते. लोकआयुक्तांना कोणतेही अधिकार नव्हते. त्यांना भ्रष्टाचाराच्या तक्रारींची चौकशी करण्याची तरतूद कायद्यात नव्हती. लोकआयुक्त हे मुख्यमंत्र्यांनी निवडलेले होते. त्यांना स्वायत्तता नव्हती. नव्या कायद्यात सर्व कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्री व मुख्यमंत्री यांच्या चौकशीचे अधिकार आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल. या कायद्यामुळे राज्यात क्रांती घडेल, असा विश्वास हजारे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार
ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी करून त्यांचे जनतेच्या वतीने आभार मानले. दोघांनीही या कायद्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल, सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असल्याचे सांगितले, असे हजारे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...