आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडक भूमिका:लव जिहाद, धर्मांतराचे प्रकार झाल्यास पोलिस निरीक्षकांवरच निलंबनाची कारवाई करा; महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे निर्देश

अहमदनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

"लव जिहाद' ,धर्मांतराचे प्रकार झाल्यास त्या त्या भागातील पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना जबाबदार धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शुक्रवारी ( 7 एप्रिल ) ला दिले.

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. खासदार डॉ. सुजय विखे, आमदार लहू कानडे, आमदार बबनराव पाचपुते, आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार,विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी शेखर, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलिस अधीक्षक राकेश ओला, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी आदी यावेळी उपस्थित होते.

विखे म्हणाले, गुन्हेगारांच्या मिरवणुका काढल्या जातात, अशा गुन्हेगारांच्या मिरवणुका काढण्यापेक्षा गाढवावरून त्यांच्या मिरवणुका काढा त्यामुळे चांगला परिणाम होईल. मोक्का लावलेले गुन्हेगार मोकाटपणे फिरत आहेत.

लव जिहाद' ,धर्मांतर असे प्रकार वाढत आहेत. आपले पोलिस काय करतात, पोलिसांनी गुन्हेगारांना कायद्याचे राज्य काय असते ते दाखवावे. असे प्रकार होत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही कुठल्याही परिस्थितीत यावर कारवाई झालीच पाहिजे असे विखे यांनी यावेळी सांगितले.

खालच्या स्तराचा पोलिस कर्मचारी वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी आहे. त्यांच्यावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना हवालदारावर देखील कारवाई करण्याचा अधिकार नाही. अधिकाऱ्यांना बांधून ठेवू नका, पोलिसांनी वाढलेल्या गुन्हेगारीवर मोकळेपणाने काम करावे. गुन्हेगारीचे प्रमुख कारण असलेल्या वाळूमाफिया देखील वाळूच्या नवीन धोरणामुळे संपणार आहे असे देखील त्यांनी सांगितले.

पोलिसांनी दबावाखाली काम करू नये

शांतता कमिटीच्या बैठकीत खासदार डॉ. सुजय विखे यांनी थेट विशेष पोलिस महानिरीक्षकांसमोरच पोलिस प्रशासनाला धारेवर धरत पोलिसांनी कुठल्याही दबावाखाली काम करू नये असे सांगून अप्रत्यक्षपणे स्थानिक पोलिस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

पोलिस आपल्या पॉवरचा वापर करतील

विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी शेखर म्हणाले, शांतता कमिटीच्या बैठकीत डीजे, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा झाली. पोलिसांना कायद्याने पाॅवर दिला आहे. आम्ही पाॅवर सुरू केला तर गुन्हेगारांना पळता येणार नाही. गुन्हेगारांची लिस्ट व रेकॉर्ड पोलिस बनवतो, तडीपारांचा प्रस्ताव देखील आम्ही पाठवतो. असे त्यांनी सांगितले.