आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांतता समिती बैठक:नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करू; पोलिस अधीक्षक पाटील यांचा इशारा

संगमनेर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन होण्यासाठी गणेश मंडळांनी सहकार्य करावे. डीजेला परवानगी देण्यात येणार असली तरी दोन पेक्षा अधिक स्पीकर लावता काम नये. प्लाजमा व डॉल्बीला परवानगी राहणार नाही. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिला. येथील प्रशासकीय भवनातील सभागृहात सोमवारी आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत पाटील बोलत होते. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, अप्पर पोलिस अधीक्षक ज्योती भोर, पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, मुख्याधिकारी राहुल वाघ, गटविकास अधिकारी अनिल नागणे, पोलिस निरीक्षक सुनील पाटील, सहाय्यक निरीक्षक सुजीत ठाकरे आदींसह तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. यासाठी नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. नियमांचे उल्लंघन होता काम नये. नागरिकांना त्रास व जातीय तेढ निर्माण होईल, असे कृत्य करू नका. सामाजिक जाणिवेचे भान ठेवा. समाज माध्यमांचा योग्य वापर करा. काही अडचणी असतील तर त्या सोडविण्यासाठी प्रशासन तुमच्या बरोबर असेल, असे त्यांनी सांगितले. प्रांताधिकारी डॉ. मंगरूळे म्हणाले, गणेश विसर्जना दरम्यान अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. गणेश मूर्ती विसर्जनासाठी पालिकेकडून कृत्रिम तलाव उभारले जाणार आहे. त्यामुळे नदी पात्रात विर्सजन करण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. ठराविक व्यक्तींना सोडण्यात येणार असल्याने नागरिकांनी नदी पात्रात विर्सजन करण्याचा अट्टाहास धरू नये. मोकाट जनावरे, रस्त्यांची डागडुजी, वीज पुरवठा व मुबलक सुविधा देऊ, असे आश्वासन त्यांनी सांगितले. पतीत पावन संघटनेचे प्रा. एस. झेड, देशमुख, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख कैलास वाकचौरे, काँग्रेसचे विश्वास मुर्तडक, शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी, अ‍ॅड. श्रीराम गणपुले, नरेश माळवे आदींनी महत्वपूर्ण सूचना मांडल्या. प्रास्ताविक उपअधीक्षक राहुल मदने यांनी केले. सूत्रसंचालन निलेश प्रभात यांनी तर आभार मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...