आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:वाळू तस्करीप्रकरणी मंडलाधिकाऱ्यासह तलाठी निलंबित; महसूल मंत्री विखे यांच्या दौऱ्यानंतर कारवाई

अनिल गर्जे | कुकाणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूतस्करीकडे दुर्लक्ष केल्याने मंडलाधिकारी सुनील लवांडे व प्रवरासंगम सज्जाचे तलाठी भारत म्हसे या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेवासे तालुका दोऱ्यात वाळूउपसा करणाऱ्यासाठी वापरात असलेल्या दोन बोटी मंत्री विखे यांच्या आदेशानंतर जप्त करण्यात आल्याने महसूल व पोलिस यंत्रणेत खळबळ उडाल्यानंतर महसूलच्या स्थानिक यंत्रणेवर कारवाईची टांगती तलवार होती. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी मंडलाधिकारी लवांडे यांचे, तर प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी तलाठी म्हसे याचेवर निलंबनाची कारवाई केली.

महसूलमंत्री विखे यांनी पदभार घेतल्यानंतर राज्यातील वाळू तस्करीसंबंधी कठोर भूमिका जाहीर केल्याने जनतेतून समाधानकारक प्रतिक्रिया येत असतानाच पालकमंत्री विखे हे नेवासे तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी करण्यासाठी आले असताना वाळूतस्करीचा मोठा प्रकार त्यांच्यासमक्ष उघड झाला होता. वाळूचोरीसाठी वापरल्या जात असलेल्या दोन बोटी चक्क मंत्र्यांना दिसल्याने महसूल व पोलिस यंत्रणेचा मंत्री विखे यांनी जागेवरच समाचार घेतला होता. मंत्र्यांचा दौरा नियोजित व महसूल व पोलिस यंत्रणेला माहित असतानाही वाळूतस्करीकडे कानाडोळा करण्यात आल्याचे दिसताच मंत्री विखे यांनी जिल्हाधिकारी यांना याप्रकरणी कारवाईचे आदेश दिले होते. तेव्हापासूनच कारवाईची तलवार लटकलेली होती. नेवासे तालुक्यात मुळा, प्रवरा व जायकवाडी या तीनही जलाशयांचा भाग येतो. त्यामुळे वाळूतस्करीला अनुकूल असा तालुका मानला जातो.

गावठी कट्टे, खुनाचे, गंभीर मारामारीचे प्रकार वाळूतस्करीतून पुढे आले. असे असतानाही मलिदा मिळतो म्हणून सरकारी यंत्रणेचा याकडचा डोळेझाकपणा तसा जनतेच्या दृष्टीने संतापाचा विषय ठरला. महसूलमंत्र्यांसमोरच वाळूतस्करीचे पितळ उघडे पडल्याने तालुक्यातील सरकारी यंत्रणेचे जाणीपूर्वक दुर्लक्ष दिसून आले. जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांनी कारवाईचा बडगा उगारल्याने स्थानिक महसूल यंत्रणेला मोठा दणका बसला. पालकमंत्री विखे यांच्या दौऱ्यात वाळूतस्करीकडे केलेले दुर्लक्ष मंडलाधिकारी व तलाठ्यास भोवले. पालकमंत्री विखे यांच्या दौऱ्यात पोलिसांनी दोन बोटी जप्त करून संबंधितांवर गुन्हाही नोंदवला.

पैसे घेऊन पिकांचे पंचनामे, तिघे निलंबित
गेल्या दोन दिवसांपूर्वीच पावसाने नुकसानग्रस्त शेतपिकांच्या पंचनाम्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांना पैशाची मागणी केल्याच्या तक्रारीवरून नेवासे तालुक्यातील चिलेखनवाडी येथील ग्रामसेविका, कृषी सहायक व ग्रामपंचायत कर्मचारी अशा तिघांना निलंबित केल्यानंतर गुरुवारी मंडलाधिकारी आणि तलाठ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना नोटिसा
पालकमंत्री विखे यांच्या दौऱ्यातच वाळूउपसा करणाऱ्या बोटी आढळल्याने याप्रकरणी नगरचे प्रांताधिकारी व नेवासे तहसीलदार यांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. नेवासे खुर्दचे मंडलाधिकारी लवांडे व प्रवरासंगमचे तलाठी म्हसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने जिल्ह्याच्या महसूल यंत्रणेला महसूल मंत्र्यांनीच वाळूतस्करीच्या प्रश्नावर दणका दिला.

बातम्या आणखी आहेत...