आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमृतसागर दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीतील मविआ पदाधिकाऱ्यांच्या व विशेषकरून राष्ट्रवादीच्या पदरी पडलेल्या पराभवाने राष्ट्रवादीचे आमदार डॅा. किरण लहामटे यांच्यावरचा राग व्यक्त होताना दिसतो. राष्ट्रवादीच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी या वर्तणुकीची तक्रार रविवारी ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या कानावर घातली. अजित पवार यांना संदीप भानुदास शेणकर यांनी एक पत्र दिले. या पत्राचे वाचन रस्त्यावरच पवार यांनी केले. लागलीच मुंबईत मंगळवारी, सकाळी ८ वाजता पदाधिकाऱ्यांना दादांनी चर्चेसाठी पाचारण केले.
बहुतांश पदाधिकाऱ्यांची आमदार डॉ. लहामटे व जिल्हाध्यक्ष यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी आहे हे लक्षात घेऊन दादांनी हे पाउल उचलले. अकोले शहराजवळील औरंगपूर फाट्यावर राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बबन वाळुंज यांच्या घरासमोर अजित पवारांची भेट पक्षांतील नाराज पदाधिकाऱ्यांनी रविवारी घेतली. आपला संताप व्यक्त करीत संदीप शेणकर यांनी अजित पवार यांना पत्र दिले.
त्यात म्हटलेय, मी २०१९ पूर्वीपासून राष्ट्रवादी कार्यकर्ता म्हणून काम करतो. मधुकर पिचड पिता-पुत्रानी राष्ट्रवादी पक्ष सोडल्यानंतर पक्षाच्या २ नगरसेविकांच्या मदतीने अकोल्यात राष्ट्रवादी पक्ष सावरण्याचे काम केले. यातून मतदारसंघात पुन्हा नव्या जोमाने आपला पक्ष उभा राहीला. परंतु आज मतदारसंघात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची पूर्णपणे वाताहत झाली. पक्ष वाढीसाठी तालुक्यातून कुणीही प्रयत्न करताना दिसत नाहीत. जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्षाकडे अनेकदा तक्रारी केल्या.
पण फक्त उडवाउडवीचीच उत्तरे मिळाली. यापुढील काळात अकोले मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष धोक्यात येऊ नये म्हणूनच आपली भेट घेऊन चर्चा करणे महत्वाचे आहे. हे पत्र अजित पवार यांनी रस्त्यावरच वाचले व ताबडतोब संबंधित पदाधिकाऱ्यांना मंगळवारी (७ फेब्रुवारी) सकाळी मुंबईतील बंगल्यावर बैठकीसाठी वेळ दिला. पदाधिकाऱ्यांच्या या तक्रारी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, आमदार डॉ. लहामटे व अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या कार्यपद्धतीवर आहेत, याचाच भाग म्हणूनकी काय, पण आमदार डॉ. लहामटे सोमवारी राजूर येथील आपला जनता दरबार सोडून मुंबईत डेरेदाखल झाल्याची चर्चा आहे.
अजित पवार यांना भेटणार राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना मंगळवारी मुंबईत अजित पवार यांनी भेटीसाठी बोलावले आहे. पदाधिकाऱ्यांना पक्षीय वाढीसाठी मतदारसंघात अडचणी येतात. जिल्हा व तालुक्यातील नेते याकडे दुर्लक्ष करीत आहेत. तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडेंची भूमिकाच स्पष्ट नाही म्हणून त्यांना बरोबर न घेताच आम्ही पवारांना भेटणार आहोत. पण ते आमच्या भूमिकेबरोबर आहेत, असे राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष संदीप शेणकर यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.