आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलजीवनचा श्रेयवाद!:तनपुरे - विखे आमने-सामने; नगरमध्ये राजकारण तापले, 'राष्ट्रवादी'कडून धनंजय मुंडे करणार भूमिपूजन

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हाभरात पाणीपुरवठा योजनांची उभारणी करण्यात येत आहे. या पाणी योजनांचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे असे म्हणत, भाजप खासदार सुजय विखे यांनी 12 दिवसांपूर्वी वांबोरी पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केले होते.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही याच योजनेच्या भूमिपूजनासाठी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते आमदार धनंजय मुंडे यांना उतरवले आहे. त्यामुळे एकाच योजनेचे भाजप नंतर राष्ट्रवादीकडून भूमिपूजन होताना पाहायला मिळणार आहे.

पुन्हा श्रेयवाद पाहायला मिळणार

राहुरी विधानसभा मतदारसंघातील वांबोरी गावात जल जीवन मिशन अंतर्गत सुमारे 40 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. राहुरी मतदारसंघातील वांबोरी हे मोठे बाजारपेठेचे गाव असून मतदानाचे मोठे पॉकेट याच गावाला मानले जाते. महाविकास आघाडी सरकार असताना माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी वांबोरीत विशेष लक्ष घातले. त्याचवेळी स्थानिक पातळीवर तनपुरे गट विरुद्ध पाटील गट यांच्यातील सुप्त संघर्ष धुमसत होता. स्थानिक विकास कामांबाबत सोशल मीडियावरही अनेकदा श्रेय वादाचे राजकारण तापल्याचे पाहायला मिळाले. राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजप व शिंदे गटाचे सरकार सत्तेत आले. या निमित्ताने जलजीवन मिशनच्या श्रेय वादावरून तनपुरे विरुद्ध विखे असा संघर्ष पाहायला मिळत आहे.

आमदार नसल्याचा लगावला टोला

जिल्हा परिषदेचे माजी सभापती अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते वांबोरीत पाणी योजनेचे भूमिपूजन घडवून आणले. त्यावेळी खासदार विखे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2019 च्या घोषणेची आठवण करून देत, त्यावेळी विद्यमान व्यक्ती आमदार नसल्याचा टोला माजी मंत्री तनपुरे यांचे नाव न घेता लगावला होता.

त्यानंतर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्यासह नितीन बाफना, किसन जवरे यांनी वांबोरी पाणीपुरवठा योजनेचे स्वतंत्र भूमिपूजन घडवून आणण्याचे नियोजन आखले. या प्रयत्नांना माजी मंत्री तनपुरे यांनी बळ देऊन धनंजय मुंडे यांनाच भूमिपूजनासाठी बोलावले आहे. त्यामुळे विखेंच्या टीकेला टोकाचे प्रत्युत्तर मिळणार का ? हा प्रश्न चर्चिला जात आहे.

अहमदनगर जिल्ह्यात 829 योजना

हर घर से जल उपक्रमांतर्गत हाती घेण्यात आलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत प्रतिमा 55 लिटर पाणी देण्याचे नियोजन आहे. अहमदनगर जिल्ह्यात 829 पाणी योजना होणार आहेत यासाठी सुमारे 1 हजार 317 कोटी खर्च येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...