आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांचा सत्कार:ज्ञानदानासोबत विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्याचे कार्य शिक्षक करतात; आ. श्वेता महाले यांचे प्रतिपादन

चिखली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देणारा मार्गदर्शक म्हणजे शिक्षक. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काही ना काही सुप्त गुण असतातच. बौद्धिक क्षमता ही विद्यार्थ्यांनुरुप बदलत असते, त्या बौद्धिक क्षमतेला आकार देण्याचे काम शिक्षक करत असतो. प्रत्येक विद्यार्थ्याला पंख आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. परंतु या पंखांना उडण्याची शक्ती देण्याचे काम शिक्षक, गुरू देत असतो, असे प्रतिपादन आ.श्वेता महाले यांनी शिक्षक दिनी शिक्षकांच्या आयोजित सत्कार सोहळ्यात मार्गदर्शन करताना केले.

चिखली पंचायत समिती अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार सोहळा ५ सप्टेंबर रोजी पार पडला. यावेळी तालुक्यातील ३५ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन आ. श्वेता महाले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी श्रीकृष्ण सावळे, भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, प्रवीण वायाळ, अरुण पाटील, लक्ष्मणराव शेळके, गणेश भगत, केंद्र प्रमुख पी.एम.सपकाळ यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक आर.डी.शिंदे यांनी केले. पुढे बोलताना आ. महाले यांनी सांगितले की,भारतीय परंपरेतील “गुरू शिष्य “ही भारताने जगाला दिलेली महान परंपरा आहे. हजारो वर्षांपासून आपण गुरू शिष्य नात्याला वृध्दींगत करणारी गुरू पौर्णिमा साजरी करतो. आधुनिक भारतात आपण याच परंपरेला पूरक असणारा उत्सव शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारतीय तत्त्वज्ञ होते. ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते. सत्याग्रह, तुरुंग या बाबी त्याच्या जीवनात नव्हत्या. महात्मा गांधीशी त्याचे सबंध होते. दरम्यान, प्रशासन ही त्यांनी यशस्वीपणे सांभाळले असल्याचे आ. महाले यांनी सांगितले. चिखली विधानसभा मतदार संघातील जि.प.शाळांचा विकासाचा कृती आराखडा तयार करणार असून प्रत्येक गावातील नागरिक लोकप्रतिनिधींकडे विविध समस्या घेऊन येतात व त्यासाठी निधीची मागणी करतात. परंतु दुर्दैवाने त्यामध्ये शाळांच्या विकासाच्या समस्यांचा समावेश नसतो. परंतु मी स्वतः लक्ष घालून चिखली विधानसभा मतदारसंघातील जि.प.शाळांच्या विकासाचा कृती आराखडा तयार करणार असून येणाऱ्या पाच वर्षांमध्ये पूर्णपणे त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देखील आ. श्वेता महाले यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्मिला शेळके यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...