आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दावा:हैदराबादचा तो वकील म्हणतो; बाळ बोठे माझ्याकडे ज्युनिअरशीपसाठी आला होता

नगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाळ बोठे व माझी कोणतीही ओळख नाही. रेखा जरे हत्याकांड घटनेशी माझा संबंध नाही. बोठे माझ्याकडे ज्युनिअर वकीलशीप करण्यासाठी आला होता, असा दावा हैदराबाद येथील वकील जनार्दन अकुला चंद्रप्पा याने शनिवारी न्यायालयात केला. मात्र, त्याच्या या दाव्याला जरे यांचे वकील अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी आक्षेप घेतला. बोठे आणि चंद्रप्पा यांची आधीपासून ओळख होती व चंद्रप्पा यानेच बोठेला हैदराबाद येथे मोबाइल व सीमकार्ड मिळवून दिले होते, असे म्हणणे त्यांनी मांडले. दरम्यान, चंद्रप्पा याच्यावरील आरोप निश्चितीवर १४ जानेवारीला अंतिम निर्णय होणार आहे.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडाच्या खटल्यात १२ आरोपी आहेत. यापैकी एक महिला आरोपी पी.अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी (हैदराबाद) फरार आहे. तर राहिलेल्यांपैकी ज्ञानेश्‍वर शिंदे, आदित्य चोळके, फिरोज शेख, ऋषिकेश पवार, सागर भिंगारदिवे व बाळ बोठे, शेख इस्माईल शेख अली, राजशेखर चाकाली, अब्दुल रहेमान अब्दुल अरिफ व महेश तनपुरे या आरोपींविरुद्ध आरोप निश्चिती झाली आहे. हैदराबाद हायकोर्टातील वकील जनार्दन चंद्रप्पा याने त्याच्यावरील आरोप निश्चितीला आक्षेप घेतला होता. त्याने शनिवारी न्यायालयासमोर म्हणणे मांडले. जरे हत्याकांड घटनेशी माझा संबंध नाही. बोठे माझ्याकडे आला होता. तुमच्या मार्गदर्शनाखाली हैदराबाद हायकोर्टात ज्युनिअरशीप करायची असल्याची विनंती त्याने केली.

त्यावेळी त्याने काय घडले, हे सांगितले नाही. ज्युनिअरशीप करण्यासाठी मी त्याला हैदराबाद हायकोर्टात घेऊन जात होतो. तेथे एन्ट्री गेटला त्याचे आधारकार्डही दिले होते. तो हैदराबादमध्ये कोठे राहात होता, याची माहिती नव्हती. तो रोज सकाळी माझ्या ऑफिसमध्ये यायचा व मी त्याला हायकोर्टात घेऊन जायचो. त्यावेळी कोणीतरी मला महाराष्ट्रातील एका ऑफेन्समध्ये तो फरार असल्याचे मला सांगितले होते, असा दावा जनार्दन अकुला याने न्यायालयासमोर केला.

अ‍ॅड. पटेकर यांनी याला आक्षेप घेतला. बोठे फरार असतानाच्या काळात चंद्रप्पा यानेच त्याला हैदराबादला लपवून ठेवले होते. बोठेचे आधारकार्ड उपलब्ध असताना त्यावर सीमकार्ड न घेता चंद्रप्पानेच हैदराबाद हायकोर्ट कॅन्टीनमध्ये काम करणारे पी. अनंतलक्ष्मी, शेख इस्माईल व राजशेखर चकाली यांचे मोबाईल व सीम त्याला उपलब्ध करून दिले. त्यामुळे चंद्रप्पा याने बोठेला मदत केल्याचे यातून स्पष्ट होते, असा युक्तिवाद अ‍ॅड. पटेकर यांनी केला.

दोघांच्या जामिनावर १० जानेवारीला सुनावणी
आरोपी सागर भिंगारदिवे व आदित्य चोळके यांनी वैद्यकीय व कौटुंबीक कारणामुळे औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर सरकार पक्षातर्फे या दोघांविरुद्ध जिल्हा न्यायालयात झालेल्या आरोप निश्‍चितीची माहिती सादर करण्यात आली आहे. येत्या १० जानेवारीला सुनावणी होणार आहे. दरम्यान, खटला इतरत्र वर्ग करण्याच्या बोठे याच्या मागणीवर २३ जानेवारीला खंडपीठात सुनावणी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...