आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासावेडी उपनगरासाठी स्मशानभूमीचा विषय महापालिकेच्या स्थापनेपासून प्रलंबित आहे. स्मशानभूमीसाठी जागा आरक्षित असताना तब्बल ३२ कोटी खर्च करून नवीन जागा घेण्याचा विषय सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. विविध राजकीय पक्ष, नेत्यांनी तसेच काही नगरसेवकांनी या विषयाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मनपा आयुक्तांनी ठराव विखंडित करण्यासाठी पाठवावा, अशी मागणी माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केली आहे. आयुक्त कोणाच्याही दबावाला बळी न पडता नगरकरांच्या पैशाचा गैरवापर होवू देणार नाहीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
कळमकर यांनी म्हटले आहे की, महासभेत प्रशासनाच्या संमतीने सावेडी स्मशानभूमीसाठी ३२ कोटी रुपये खर्चून जागा खरेदी करण्याचा विषय घेण्यात आला. या विषयावरुन वादंग होण्याची शक्यता असल्याने तसेच ठोस भूमिका घेतल्यास अडचणीत येवू हे ओळखून अनेक नगरसेवकांनी सदर विषय मंजुरीवेळी सभागृह सोडले. यानंतर कोरम नसतानाही हा ठराव मंजूर करण्यात आला. या उधळपट्टी विरोधात राजकीय पक्षांनी आवाज उठवल्यानंतर नगरसेवकांनीही लेखी विरोध करण्यास सुरुवात केली.
वास्तविक सभागृहातच नगरसेवकांनी भूमिका घेवून विषय नामंजूर करायला हवा होता. प्रशासनाला मनपाच्या आर्थिक परिस्थितीच पूर्ण माहिती असतानाही हा प्रस्ताव विषय पत्रिकेवर आलाच कसा हा सुध्दा कळीचा मुद्दा आहे. शहरातील रखडलेल्या रस्त्यांच्या कामांना ३ कोटी खर्च करण्याची कुवत नसताना स्मशानभूमीच्या जागेसाठी ३२ कोटींची उधळपट्टी कशी होवू शकते, हाच मोठा प्रश्न आहे. सावेडी उपनगराला स्मशानभूमीची गरज नक्कीच आहे. परंतु, त्यासाठी जागा आरक्षित असताना आणि संबंधित जागामालक ती देण्यास तयार असताना वेगळ्या जागेचा अट्टाहास धरणे चुकीचे आहे. आता मनपा आयुक्तांनीच शहरातून होणारा विरोध लक्षात घेता कर्तव्य बजावण्याची वेळ आली आहे, असेही कळमकर यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.