आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी प्रदर्शन:राहुरीत होणारे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी ठरणार पर्वणी, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या संकल्पनेतून 14 ते 18 या कालावधीत होणार प्रदर्शन

राहुरी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे व संचालक मंडळाच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांसाठी १४ ते १८ एप्रिल या कालावधीत राहुरीत येथे होणारे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. वायएमसीए प्रांगणात शरद कृषी महोत्सव या नावाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. चार वर्षांपूर्वी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यानंतर यंदा बाजार समितीच्या वतीने ही संधी उपलब्ध करून देण्यात आली.

सततची दुष्काळी परस्थिती, अवकाळी पाऊस, हवामानात होणारे बदल, यामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला. या दुष्टचक्रातून शेतकरी वाचवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड शेतीला मिळण्याची गरज आहे. कृषी प्रदर्शनामध्ये शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान, बी-बियाणे सेंद्रिय शेती, गांडूळ खत निर्मिती, पशुखाद्य, हार्वेस्टिंग यंत्रे, ट्रॅक्टर्स आधुनिक अवजारे, रासायनिक खते, कृषी मार्गदर्शन पुस्तके, शेळीपालन, ठिबक सिंचन, सोलर उत्पादने, मच्छ व्यवसाय, मच्छ पालन, महिला बचत गटाचे उत्पादने, ऑटो, गृहोपयोगी वस्तू, धान्य महोत्सव अशा अनेक नामांकित कंपन्यांचे स्टॉल असणार आहेत.

या कृषी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणून दीड टन वजनाचा व तब्बल एक कोटी रूपये किंमत असलेला गजेंद्र रेडा शेतकऱ्यांना पाहण्यासाठी मिळणार आहे. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी संयोजकांच्या वतीने लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आलेले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी दररोज परिसंवाद व कृषी तज्ञांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञान पहावयास मिळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आल्याने या कृषी प्रदर्शनाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती अरुण तनपुरे व वाबळेज इव्हेंटचे अजय वाबळे, विजय शेलार, नितीन जठार यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...