आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा प्रवेशोत्सव:मोबाईलकडून प्रत्यक्ष शाळेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फलक चित्राने वेधले लक्ष

अहमदनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाकाळात दोन वर्ष शालेय जीवन विस्कळीत झाले होते. आता बुधवारपासून (15 जून) नियमित शाळा सुरू होणार आहेत. 13 व 14 जून रोजी शाळेच्या पूर्वतयारीसाठी शिक्षक कामाला लागले. शहरातील ज्येष्ठ कलाशिक्षक नंदकुमार यन्नम यांनी ऑनलाइन अभासी शिक्षणाकडून प्रत्यक्ष शाळेकडे जाताना विद्यार्थ्यांचे फलकावर रेखाटलेले चित्र सर्वांचे लक्ष वेधत आहे.

उन्हाळ्याच्या सुटीनंतर आता विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज होत आहेत. त्यांच्या शाळेची ओढ आणि आस्था निर्माण होण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘प्रवेशोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. तसेच शिक्षणापासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी शोध मोहीम राबवण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय विद्यालयात कलाशिक्षक यन्नम यांनी मंगळवारी रेखाटलेले विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मोबाईलकडून प्रत्यक्ष शाळेकडे जाणारे चित्र सर्वांचा कौतुकाचा विषय ठरत आहे. कला शिक्षक यन्नम यांचा हुबेहुब व्यक्तीचित्रण रेखाटण्याचा हातखंडा आहे. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक नामांकित व्यक्तिमत्त्वाचे चित्र रेखाटले आहे. काही वर्षांपूर्वी एमआयआरसीमध्ये आलेले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे देखील त्यांनी व्यक्तीचित्र रेखाटले होते.

फूल, शालेय उपयोगी साहित्य देऊन होणार स्वागत

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत फूल किंवा अन्य शालेय उपयोगी साहित्य देऊन करावे. विद्यार्थ्यांमध्ये शाळेबाबत आवड निर्माण होण्यासाठी शाळेतील वातावरण चैतन्यमय आणि उत्साहवर्धक ठेवण्याबाबत मार्गदर्शन करावे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...