आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:अगस्ती कारखान्याची निवडणूक 13 जूनला जाहीर होणार; संचालक होण्यासाठी उत्पादक, सभासदांसह पुढाऱ्यांचे गुडघ्याला बाशिंग

अकोले22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याची २०२२-२७ पंचवार्षिक निवडणूक १३ जून रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक जाहीर झाल्यावर अगस्तीच्या संचालकांना आचारसंहिता लागू होईल. यामुळे त्यांच्यावर आर्थिक व इतर अनेक निर्बंध येतील. आचारसंहितेनंतर हे संचालक सभासदांसाठी कोणतेच अनुकूल निर्णय घेऊ शकणार नाहीत. आता १३ जूनपासून निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने विविध राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांची उमेदवार होण्यास गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी सुरू झाली आहे.

मीच काय पण आमच्या घरातील कोणीही अगस्तिच्या निवडणूकीत उमेदवारी करणार नाहीत, अशी दर्पोक्तीपूर्ण वचने गावोगावातून शेतकऱ्यांना दिलेले हे सभासद अगस्तिच्या निवडणुकीत उमेदवारी करतील की निवडणुकीपासून तटस्थ राहून नेतागिरी करतील, हेही पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भाजपचे नेते व अगस्तिचे अध्यक्ष मधुकर पिचड व राष्ट्रवादीचे नेते व उपाध्यक्ष सीताराम गायकर हे एकमेकांवर कुरघोडी करून समोरासमोर स्वतंत्र पॅनल उभे करतील की, जमवून घेतील, याकडेही सभासदांचे लक्ष लागून आहे. राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे हे परस्पर विरूद्ध भूमिकेतून राजकीय खेळी खेळतात की एकमेकांना पूरक ठरतात तेही पहावे लागेल. २ जून रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत डेरेदाखल होण्यास निघालेले पण तब्येतीत बिघाड झाल्याने प्रवेश पुढे ढकललेले भाजपचे जेष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निष्ठावंत कैलास वाकचौरे यानंतरही आहे तिथेच थांबणार की राष्ट्रवादीत दाखल होणार, याकडेही नेत्यांचे लक्ष लागून आहे. तसे पाहिले तर कैलास वाकचौरे यांचा राष्ट्रवादी प्रवेशच नैतिक नाही, कारण ते जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीकडून गटनेते आहेत, याचा विसर नेत्यांना पडलेला दिसतोय. यांच्या काँग्रेसकडून जिल्हा बँक संचालक मधुकर नवले, अगस्तिचे संचालक मीनानाथ पांडे, तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, सोन्याबापू वाकचौरे यांची भुमिका नगरपंचायत निवडणुकीतील चूक सुधारेल काय? याकडेही सभासदांचे लक्ष आहे.

चुकीला माफी नाही, हे ते विसरले
अगस्तिच्या प्रशासनाकडूनच माहिती अवगत करून ती सभासदासमोर विस्कटून मांडत जिल्हात व राज्यात अगस्तिची टवाळी व बदनामी केली. अगस्ति ऋषी महाराजांच्या नावाने हा साखर कारखाना आहे, ते अगस्ति महाराज यांची ही सर्व थेरं पहात आहेत. अगस्ति महाराज व ऊस उत्पादक सभासदांकडे मात्र चुकीला माफी नाही, हे ते विसरून गेले आहेत.
मच्छिंद्र धुमाळ, अगस्ति कारखाना संचालक.

बातम्या आणखी आहेत...