आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:मराठा आरक्षण लढाई एकाच व्यासपीठावरून, पुढील आठवड्यात ठरणार आंदोलनाची दिशा

शिर्डी18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विखेंच्या नेतृत्वात एकवटले विविध संघटनांचे १८ पदाधिकारी

आरक्षणासाठी मराठा समाजातील सर्व संघटनांनी आता एकाच व्यासपीठावरून लढा देण्याचा निर्धार केला असून त्यासाठी पुढील आठवड्यात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत राज्यातील मराठा समाजातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलावून आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येणार आहे.

आरक्षणासाठी आतापर्यंत मोर्चे निघाले, कार्यकर्त्यांचे बळीही गेले, आंदोलनाच्या केसेस दाखल झाल्या; परंतु हाती काहीच पडले नाही. त्यामुळे मंगळवारी (दि. १) राज्यभरातील विविध संघटनांचे प्रमुख १८ पदाधिकारी लोणीत एकत्र आले व बैठक घेऊन त्यांनी आमदार विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संघटनांची समन्वय समिती स्थापन करण्यास मान्यता दिली. आंदोलन, न्यायालयातील पुढील लढाई तसेच केंद्र आणि राज्य सरकारशी या समितीच्या माध्यमातून चर्चा करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या गठित करण्याचेही या वेळी निश्चित करण्यात आले.

आरक्षणासाठी राज्यात वेगवेगळी आंदोलने करणाऱ्या सर्व संघटनांनी एका व्यासपीठावर येऊन सरकारवर दबाव आणावा याबाबत विखेंनी नुकतेच आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून ही बैठक झाली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर भविष्यातील लढाईची रणनीती ठरवण्यासाठी उपस्थित प्रतिनिधींनी महत्त्वपूर्ण सूचना करून त्याची एकत्रितपणे ठोस कृती राज्य आणि जिल्हापातळीवर करण्यावरही बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. विखे यांचे नेतृत्व आरक्षणाच्या मागणीला नवे पाठबळ देणारे ठरेल, अशा भावना या वेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करत भविष्यात आरक्षणाची कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई नियोजनबद्ध करण्याचा विचार निर्धार व्यक्त करण्यात आला. इतकी वर्ष लढाई सुरू असतानाही मराठा समाजातील एकाही आमदार व खासदाराने समाजाच्या एकजुटीबाबत आपली मते मांडली नाही. परंतु, विखंेचा पुढाकार महत्त्वपूर्ण असल्याने त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी आलो असल्याचे छावा संघटनेचे नानासाहेब जावळे यांनी सांगितले.

बैठकीस महेश डोंगरे (समन्वयक), नानासाहेब जावळे पाटील (अखिल भारतीय छावा संघटना, लातूर), सुनील नागणे (संस्थापक, शंभूराजे युवा क्रांती, तुळजापूर), बन्सीदादा डोके (प्रदेशाध्यक्ष, भारतीय मराठा महासंघ, मुंबई), डॉ. आप्पासाहेब आहेर (राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय मराठा महासंघ, मुंबई), संजय सावंत (संस्थापक, शिवक्रांती सेना, बीड), लक्ष्मण शिरसाठ (संस्थापक, संभाजी सेना, जळगाव), गणेश शिंदे (संस्थापक, शुभा संघटना, जालना), पंजाबराव काळे (प्रदेशाध्यक्ष, छावा संघटना, नांदेड), भीमराव मराठे (केंद्रीय अध्यक्ष, मराठा युवा संघटना, जळगाव), संजय कदम (शिवसूर्या सामाजिक संघटना, भुसावळ), बालाजी सूर्यवंशी (हिंदवी सेना, लातूर), विनायकराव भिसे (संस्थापक, मराठा शिवसैनिक सेना, हिंगोली), संदीप मुटकुळे (शिवस्वराज्य संघटना, पंढरपूर), विकास गुमसुळे (मराठा वाॅरियर, धुळे), संजय करंडे (शिवराज्य युवा संघटना, उस्मानाबाद), पंकज इंगने (शिवसेना), राजेंद्र जराड (शिवबा संघटना), परमेश्वर रावत (धर्मवीर छत्रपती युवा संघटना, बीड) आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...