आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचालू गळीत हंगामात अगस्ति साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातला आजअखेर २ लाख ८९ हजार ४७५ व एकूण ४ लाख ४७ हजार मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण झाले. फेब्रुवारी संपल्यावर गेटकेनच्या ७० पैकी २८ ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्या अगस्तीच्या कार्यक्षेत्रात आणून ऊस तोडणी गती दिली. तर अगस्तीच्या कार्यक्षेत्रातील ऊसतोड वेळेत करण्यासाठी १७ मार्चनंतर गेटकेन तोड थांबवून उर्वरित सर्व टोळ्या कार्यरत होतील. अगस्तीच्या ऊस गाळप आता उद्दिष्टपूर्तीसाठी कार्यक्षेत्रा बाहेरून उसाची आवश्यकता नाही. किमान ६ लाख टन उसाचे गाळप अगस्ती चालू हंगामात करणार आहे. आता कार्यक्षेत्रातील उसातूनच हे उद्दिष्ट पूर्ण होईल व अगस्तीकडे ऊस नोंद केलेल्या उसाचे गाळप शंभर टक्के करण्यात येईल. आपण १५ फेब्रुवारीपर्यंत गाळप उसाचे सर्व पेमेंट आदा केले, तर २५ मार्चपर्यंत गाळपास आलेल्या ऊसाचे पेमेंटही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येईल. अगस्तीच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उसाचे शेवटचे टिपरू गाळप केल्याशिवाय अगस्तीचा पट्टा पडणार नाही, असा विश्वास अगस्तीचे उपाध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांनी दिला.
अगस्ती कारखान्यावर बुधवारी सकाळी गायकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ संचालक प्रकाश मालुंजकर, अशोक देशमुख, गुलाब शेवाळे, कचरुपाटील शेटे, बाळासाहेब ताजणे, राजेंद्र डावरे, महेश नवले, कार्यकारी संचालक अजित देशमुख, मुख्य लेखापाल एकनाथ शेळके, मुख्य ऊस व्यवस्थापक सयाजीराव पोखरकर, मुख्य शेतकी अधिकारी सतिश देशमुख, बोर्ड सेक्रेटरी विश्वास ढगे उपस्थित होते.
गायकर म्हणाले, अगस्तीच्या गाळप हंगामावर काही व्यवस्थापनबाह्य व्यक्ती चुकीची व अवास्तव माहिती देऊन दिशाभूल करीत आहेत. त्याचा विपरित परिणाम हंगाम व कामकाजावर होतोय. सद्यस्थितीत उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने मजूराच्या ऊसतोड कामावर प्रतिकूल परिणाम होत आहेत. त्यांनी अगस्तीच्या अडून स्वार्थी राजकारण बंद करावे. या काळात शेतकऱ्यांना वेठीस न धरता त्यांना आधार हवा आहे. गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी भान व संयम ठेवून हातभार लावावा, असेही आवाहन गायकर व संचालक मंडळाने केले.
आतापर्यंत कारखान्याचे ४ लाख ४७ हजार टन ऊस गाळप पूर्ण
इथेनॉल व आरएस विक्रीतून मिळाले १४.५३ कोटी
चालू हंगामात अगस्तिने १४ कोटी ५३ लाख रुपयांचे इथेनॉल व आरएस निर्मिती करून विक्री केली. आजूनही ७ हजार लिटर इथेनॉल शिल्लक असून त्याची सुमारे ३.५० कोटी किंमत असून या हंगामात साधारण १८ कोटी रुपयांहून अधिक रक्कम इथेनॉल व आरएस निर्मितीतून मिळेल. गाळप हंगाम संपल्यानंतरही दोन महीने इथेनॉल प्रकल्प सुरूच राहील. बायोअर्थ सुपर कंपोस्ट सेंद्रिय खत उपलब्ध करून देण्यात येत असून शेतकऱ्यांकडून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. '' अजित देशमुख, कार्यकारी संचालक, अगस्तिी साखर कारखाना.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.