आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपार्टमेंटमध्ये पाणी:एकाच पावसात आपत्ती व्यवस्थापनचा बोजवारा

नगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी रात्री नगर शहरात झालेल्या मुसळधार पावसाने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा बोजवारा उडाला. मध्यवर्ती शहरातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. तर, उपनगरात अनेक अपार्टमेंटमध्ये पाणी शिरले. अनेक वाहने पाण्याखाली गेली होती. अनेक ठिकाणी झाडे पडली. वीज पुरवठाही खंडित झाला. दरम्यान, या पावसामुळे गायब झालेल्या ओढे नाल्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील ओढे नाल्यांसह पावसाळी गटार बंद करण्यात आल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरनच वाहत होते. शहरातील चितळे रोड, दिल्लीगेट, प्रेमदान चौक, प्रोफेसर कॉलनी चौक, पटवर्धन चौक आदी सखल भागात तलावाचे स्वरूप आले. कोहिनूर मंगल कार्यालय परिसरात असलेल्या नॅशनल गन हाऊस येथे पावसाचे पाणी शिरले. नरहरीनगर, ममता गॅस परिसर, मॉडर्न कॉलनी आदी परिसरातील घरांमध्येही पाणी शिरले. तेथील घरातील साहित्यांसह वाहनांचेही मोठे नुकसान झाले.जोराचा वारा असल्याने त्याचा फटका झाडांना बसला. बुरूडगाव रस्त्यावरील चौकात मोठे झाड कोसळले.

रस्त्यावरच झाड कोसळल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाली. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच महापालिका उद्यान विभागाचे प्रमुख शशिकांत नजान यांनी मध्यरात्री आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जात कोसळलेल्या झाडाच्या फांद्या कापून रस्ता वाहतुकीस खुला केला. सावेडीत महालक्ष्मी उद्यानाजवळ लिंबाचे मोठे झाड कोसळले. वसंत टेकडी येथे असलेल्या महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानाजवळील झाड कोसळले. अनेक ठिकाणी छोटी मोठी झाडे पडल्याने मनपाच्या उद्यान विभागाकडून या बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे काम सुरू होते.

ओढे - नाले, पावसाळी गटार गेल्या कुठे?
शहरातील नालेसफाईचा विषय दरवर्षी चर्चेचा ठरतो. किरकोळ तरतूद करून थातूरमातूर नालेसफाई केली जाते. मात्र, शहर व उपनगर परिसरातील पावसाळी गटार बंद करण्यात आल्याने रस्त्यांवरून पाणी वाहत आहे. परिणामी रस्त्यांची दुरावस्था होते. तसेच भूखंड माफीयांनी ओढे नाले बुजविल्याने व महापालिकेनेही त्याकडे दुर्लक्ष केल्याने उपनगर परिसरातही गेल्या काही वर्षांपासून घरांमध्ये पाणी शिरण्याचे प्रमाण वाढले आहे.

दोन महिन्यांपूर्वीच वेधले होते लक्ष उपनगर परिसरात अनेक ठिकाणी ओढे-नाले बुजविण्यात आल्यामुळे संबंधित भागातील वसाहतींमध्ये पावसाचे पाणी शिरू शकते, याची कल्पना दोन महिने पूर्वीच महापालिकेला दिली होती. अधिकाऱ्यांबरोबर आम्ही समक्ष पाहणीही केली होती. मात्र, महापालिकेकडून या संदर्भात कोणत्याही उपाय योजना झाल्या नाहीत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले.'' योगीराज गाडे, नगरसेवक.

बातम्या आणखी आहेत...