आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:उपनगरात कचरा संकलनाचा बोजवारा; दोन-तीन दिवसाआड येते घंटागाडी, रस्त्यांच्या साफसफाईकडेही दुर्लक्ष

नगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत विविध उपाययोजना केल्याचा डंगोरा महापालिकेकडून पिटला जात आहे. मात्र, सावेडी उपनगर परिसरातील काही भागात कचरा संकलनासह रस्त्यांच्या साफसफाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. २ ते ३ दिवसांतून एकदाच कचरा गाडी येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

महापालिकेने खाजगी तत्वावर कचरा संकलनाचे काम दिले आहे. गेल्या दोन वर्षांपासून शहरात सर्वत्र कचरा संकलन नियमितपणे सुरू आहे. मात्र, काही महिन्यांपासून सावेडी उपनगर परिसरात कचरा संकलनाचा बोजवारा उडाला आहे. अनेक भागात दिवसाआड कचरा गाडी येत आहे. तर काही भागात दोन-तीन दिवसांतून एकदाच कचऱ्याची गाडी येते. त्यामुळे दररोज साचणारा ओला कचरा टाकायचा कुठे, असा सवाल नागरिकांसमोर उपस्थित होत आहे. कचरा गाडी न आल्यास अनेक नागरिक ओला कचरा रस्त्यावर अथवा मोकळ्या जागेत टाकतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटते.

उपनगरातील अनेक वसाहतींमध्ये दैनंदिन रस्त्यांची सफाईही नियमित होत नसल्याचे समोर आले आहे. ५ ते ७ दिवसातून एकदा, तर काही भागात ८ ते १० दिवसातून एकदा रस्त्यांची झाडलोट केली जाते. रस्त्यांची साफसफाई दरोज होत नसल्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, संकलित केलेला कचरा छोट्या गाड्यांमधून कॉम्पॅक्टरद्वारे डेपोकडे नेला जातो. मात्र, कॉम्पॅक्टर नादुरुस्त झाल्यामुळे कचरा संकलनात अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. शंकर शेडाळे यांच्याशी संपर्क साधला असता, कचरा संकलन नियमित सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...