आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर शहरात होत असलेल्या उड्डाणपुलाच्या पिलरवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित प्रसंग चित्राद्वारे साकारण्यात येणार आहे. उड्डाणपुलाच्या पिलावर प्रथमच अशा प्रकारची चित्रनगरी साकारली जाणार आहे. या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांनी ५० लाख तर मी ५० लाख असे एक कोटी रुपये देणार आहोत, अशी घोषणा खासदार डॉ. सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांनी सोमवारी केली. दरम्यान, उड्डाणपुलाचे उद्घाटन २४ ऑक्टोबरला होणार असल्याचेही डॉ. विखे यांनी सांगितले.
नगर शहरातील आंबेडकर चौकातील उड्डाणपुलाच्या पिलरवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित जीवनपट चित्राच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहे. सोमवारी त्याचा प्रारंभ खासदार डॉ. विखे ,आमदार जगताप यांच्या हस्ते झाला. उपमहापौर गणेश भोसले, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे, धनंजय जाधव, निखिल वारे, प्रकाश भागानगरे, र अजय चितळे, दत्ता गाडळकर, मनीष साठे, संजय चोपडा, अविनाश घुले, सतीश शिंदे आदी उपस्थित होते. डॉ. विखे म्हणाले, बाजार समितीच्या समोर असलेल्या उड्डाणपुलाच्या पिलरपासून हे चित्रे साकारण्यास सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आमदार जगताप व मी उड्डाणपुलाच्या पिलरवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रसंगाचे चित्रीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. उड्डाणपुलाच्या सात पिलरवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित असलेले प्रसंग चित्राद्वारे साकारले जाणार आहे. विखे म्हणाले, जिल्ह्याचे विभाजन नको आहे. जिल्ह्याची ताकद ही एकत्रित असणे गरजेचे आहे. जिल्हा नामांतराचा विषय महत्त्वाचा नसून, जनतेचे प्रश्न सोडवणे महत्त्वाचे आहे.
उद्घाटनाच्या तारखेवरून खासदार-आमदारांत मतभिन्नता
उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी २४ ऑक्टोबर ही तारीख खासदार डॉ.विखे यांनी सांगितली त्यांच्या शेजारी बसलेले आमदार संग्राम जगताप यांनी मात्र उड्डाणपुलाच्या तारखेबाबत अनिश्चितता दर्शवत तारीख टाकू नका, असे सांगितले. त्यामुळे पत्रकार परिषदेच्या व उड्डाणपुलाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या खासदार- आमदारांमध्ये मतभिन्नता असल्याचे स्पष्ट झाले.
पक्षविरहित विकास कामे व्हावीत
शहर विकासासाठी आम्ही दोघेही कटिबद्ध आहोत. पक्षविरहित विकास कामे झाली पाहिजे. यासाठी खासदार डॉ. सुजय विखे व मी उड्डाणपुलाच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, स्टेट बँक चौक व सक्कर चौकात कामाला गती देण्यासाठी वाहतुकीचे नियोजन केले आहे. १३ जूनपासून पुढच्या ४५ दिवसांसाठी वाहतूक शहरातील इतरत्र रस्त्यावरून वळवण्यात येणार आहे.''
संग्राम जगताप, आमदार.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.