आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • The City Dwellers Get Water Only 146 Days In A Year, 183 Days Out Of 365 Days; Water Scarcity Persists Despite Spending Crores Of Rupees On Schemes | Marathi News

कृत्रिम टंचाई:नगरकरांना वर्षभरात फक्त 146 दिवस मिळाले पाणी, दिवसाआड म्हणजेच 365 पैकी 183 दिवस मिळते पाणी; योजनांवर कोट्यवधी रुपये खर्चूनही पाण्याचे दुर्भिक्ष कायम

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुळा धरणात १७ टीएमसी साठा; तरी शहरात ‘पाणीबाणी’

मागील दहा वर्षात नगर महापालिकेने शहराच्या पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. त्यानंतरही नगर शहरात पाण्याचे दुर्भिक्ष्य कायम आहे. मुळा धरणात तब्बल १७ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. असे असतानाही शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यातही मागील वर्षभरात तब्बल ३७ वेळा पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे नगरकरांना ३६५ पैकी केवळ १४६ दिवस नगरकरांना पाणी मिळाले.

दुष्काळी नगर शहराची ओळख बदलण्यासाठी तत्कालिन नगराध्यक्ष नवनीतभाई बार्शीकर यांनी मुळा धरणातून थेट नगरला पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध केली. आजही याच योजनेवर महापालिका अवलंबून आहे. मागील दहा वर्षात पाणी पुरवठा योजनेत सुधार होण्यासाठी यूआयडीएसएसएमटी तसेच अमृत अभियान अंतर्गत सुमारे अडीचशे कोटी रुपयांच्या पाणी योजना राबविण्यात आल्या आहेत. या अंतर्गत संपूर्ण शहरात नव्याने पाईपलाईन टाकण्यात आली. पाणी उपसा वाढवण्यासाठी नवीन पंप बसवले गेले. नवीन टाक्यांची उभारणी झाली. मात्र, एवढे करूनही नगर शहरातील पाणीप्रश्न आजही कायमच आहे.

एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या १२ महिन्यांमध्ये वीज पुरवठा खंडित होणे, जलवाहिन्या फुटणे, पंप नादुरुस्त होणे अशा विविध कारणांमुळे तब्बल ३७ वेळा पाणीपुरवठा खंडित झाला होता. आधीच महापालिका दिवसाआड पाणीपुरवठा करते म्हणजे ३६५ पैकी १८३ दिवस पाणी मिळते. त्यातही ३७ वेळा पाणीपुरवठा बंद राहिल्यामुळे नगरकरांना अवघे १४६ दिवस पाणी मिळाले. आजमितीला मुळा धरणात १७ टीएमसी पाणीसाठा आहे. तरी नगरकरांना एक दिवसाआडच पाणी मिळतेय. गेल्या अनेक वर्षांपासून अशीच परिस्थिती असल्यामुळे पाणी योजनांवर करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च संशोधनाचा विषय ठरला आहे.

विविध कारणांमुळे तब्बल ३७ वेळा पाणीपुरवठा खंडित

केडगावकरांना १०० दिवसच पाणीपुरवठा
केडगाव उपनगर परिसरात स्वतंत्र पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या भागात सद्यस्थितीमध्ये ३ दिवसातून एकदा पाणी सोडले जाते. त्यातही वर्षभरात अनेक वेळा पाणीपुरवठा खंडित होतो. त्यामुळे या भागात वर्षभरात सुमारे १०० दिवसच पाणी मिळते.

कल्याण रोड परिसरात ५० दिवसच पाणी!
नगर शहर व सावेडी उपनगरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असला, तरी कल्याण रोड परिसरात मात्र ७ ते ८ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न आजही कायम आहे. या भागातील नागरिकांना वर्षभरात केवळ ४५ ते ५० दिवसच पाणीपुरवठा होतो. त्यातही बहुतांशी भाग हा टँकरवर अवलंबून आहे.

बातम्या आणखी आहेत...