आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वेक्षण:नगर स्मार्ट सिटी होण्याची आशा पल्लवित

मयूर मेहता | नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्राच्या गृह व शहरी कार्य मंत्रालयाकडून विविध उपाययोजना, सर्वेक्षणे केली जात आहेत. यासाठी शहरी कार्य मंत्रालय व स्मार्ट सिटी अभियान विभागामार्फत ‘अर्बन आउटकम फ्रेमवर्क’ अंतर्गत निवडक शहरांची माहिती संकलित केली जात आहे. यात नगर शहराचाही समावेश आहे. याच माहितीच्या मुल्यांकनाच्या आधारावर संबंधित शहरात स्मार्ट सिटी, अमृत अभियान यासारखे उपक्रम हाती घेतले जातात. त्यामुळे येत्या काळात नगर शहराचाही स्मार्ट सिटी अभियानात समावेश होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

शहरांमधील जीवनमान, आर्थिक क्षमता, शाश्वतता आणि प्रशासन याविषयी अभ्यास करून शहराच्या विकास नियोजनातील त्रुटी शोधणे, त्यादृष्टीने संभाव्य उपाययोजना करणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढवणे, या उद्देशाने ही माहिती संकलित केली जात आहे. केंद्राकडून राष्ट्रीय आणि शहर स्तरावर ‘अर्बन आउटकम फ्रेमवर्क’ अंतर्गत जून महिन्यापासून माहिती संकलित करण्यात आली आहे. नगरची संपूर्ण माहिती मनपाकडून एएमपीएलआयएफआय पोर्टलवर संकलित करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात स्मार्ट सिटी अभियानात नगरचाही समावेश होऊ शकतो.

महापालिकेच्या कामगिरीचे झाले परीक्षण
केंद्रीय शहरी कार्य मंत्रालयाने म्युनिसिपल परफॉर्मन्स इंडेक्स या उपक्रमातून सेवा, वित्त, नियोजन, तंत्रज्ञान आणि प्रशासन या पाच निकष व घटकांवर पालिकांच्या क्षेत्रीय कामगिरीचे परीक्षण केले आहे. त्याचा एकत्रित डेटाबेस तयार करण्यात आला आहे. अर्बन आऊटकम फ्रेमवर्कद्वारे आणखी अचूक व सखोल माहिती संकलित केली आहे.

‘क्वालिटी कौन्सिल’मार्फत मूल्यमापन
क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियामार्फत नागरिकांच्या राहणीमान व जीवनाचा दर्जा, आर्थिक क्षमता आणि त्यातील सातत्य आदींचे मूल्यमापन होणार आहे. इतर शहरांच्या तुलनेत त्या शहराची काय स्थिती आहे, काय उपाययोजना कराव्या लागणार आहेत, याचा अभ्यासही यातून होणार आहे. त्यानुसार शहरांच्या विकासाचे नियोजन, अपेक्षित उपायोजना आदींची अंमबजावणी करून स्मार्ट सिटी अभियान, अमृत अभियान यासारख्या उपक्रमांमध्ये शहराची निवड केली जाते. याच सर्वेक्षणात केंद्रीय शहरी कार्य मंत्रालयाने नगर शहरातील सुविधांची विविध १४ मुद्द्यांच्या आधारे माहिती संकलित केली.

सुविधा, आर्थिक स्थितीची माहिती मागवली
शहराची लोकसंख्या, शिक्षणाच्या सुविधा, आरोग्य सेवा व सुविधा, वीज प्रकल्प, विद्युत व्यवस्था, पर्यावरण, भौगोलिक रचना, कचरा व्यवस्थापन, दळणवळण आदी विविध सेवा व सुविधांची माहिती पोर्टलवर संकलित केली आहे. तसेच शहराची अर्थव्यवस्था, महापालिकेची आर्थिक स्थिती याचीही माहिती यात संकलित करण्यात आली आहे.

राजकीय इच्छाशक्ती व पाठपुराव्याची गरज
नगर शहर हे सभोवतालच्या जिल्ह्यातील इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत विकासाच्या दृष्टीने मागे पडले आहे. केंद्राकडून अमृत अभियानांतर्गत पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मनपाला दिला आहे. या योजना मार्गी लागल्यानंतर भविष्यात स्मार्ट सिटी सारख्या उपक्रमातून शहराचा विकास व्हावा, यासाठी राजकीय इच्छाशक्ती व पाठपुराव्याची गरज आहे.

नागरिकांकडून सूचना नोंदवणार
स्मार्ट सिटी अभियान संचालकांमार्फत सुरू असलेल्या माहिती संकलनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर आता संबंधित शहरातील नागरिकांकडून त्यांच्या शहर विकासाबाबत अपेक्षा, सूचना आदींची माहिती घेतली जाणार आहे. येत्या १० नोव्हेंबरपासून नागरिकांना आपल्या सूचना नोंदवता येणार आहेत. तशी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...