आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नावीन्यपूर्ण:शहरातील बांधकामाच्या राडारोड्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणार

मयूर मेहता | नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरात तयार होणाऱ्या बांधकामाच्या राडारोड्यावर आता शास्त्रोक्त पद्धतीने प्रकिया करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. या राडारोड्यावर प्रक्रिया करण्यासाठी खासगी कंपनीमार्फत प्रकल्प उभारण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. या प्रकल्प उभारणीसाठी साडेचार कोटी रुपये खर्च येणार असून, फेब्रुवारी अखेरपर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे. दरम्यान, याच कंपनीमार्फत पुढील पाच वर्षे बांधकामाच्या राडारोड्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.

दिवसेंदिवस शहराचा विस्तार होऊन उपनगरे विकसित होत आहेत. नवनव्या इमारती उभ्या होत आहेत. तसेच जुनी बांधकामे पाडून नव्याने होणाऱ्या बांधकामाचे प्रमाणही वाढत आहे. बांधकामे करताना तयार होणाऱ्या राडारोड्याचे व पाडकामाच्या कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने त्याची विल्हेवाट लावण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी, त्यातून पुनर्वापर करता येईल, अशा साहित्याची निर्मिती करण्यासाठी महापालिकेने सावेडी कचरा डेपोच्या जागेत या सी अँड डी वेस्ट प्रकल्पाची उभारणी सुरू केली आहे. नांदेड येथील गुरू रामदास कन्स्ट्रक्शन कंपनीला याचे काम देण्यात आले आहे. दररोज ५० टन बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. कंपनीमार्फत काम सुरू झाले असून, प्रकल्पाची उभारणी फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.

प्रक्रिया, देखभालीची दर निश्चिती प्रलंबित
महापालिका प्रशासनाने नांदेड येथील गुरु रामदास कन्स्ट्रक्शन कंपनीला या कामाचा ठेका दिला आहे. प्रकल्प उभारणीसाठी त्यांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. प्रकल्प उभारणीनंतर पुढील पाच वर्षांसाठी त्यावर प्रक्रिया करण्याचे कामही याच कंपनीला देण्यात आले आहे. मात्र, देखभाल-दुरुस्ती व प्रक्रिया करण्यासाठीचा दर अद्यापही महापालिकेकडून निश्चित करण्यात आलेला नाही.

संकलन व वाहतुकीसाठी स्वतंत्र यंत्रणा
शहरातील बांधकाम व पाडकामाचा कचरा संकलन करून तो प्रकल्पापर्यंत पोहोचविण्यासाठी कचरा संकलन व वाहतुकीची स्वतंत्र यंत्रणा महापालिकेकडून राबविण्यात येणार आहे. शहरातील कचरा गोळा करणाऱ्या संस्थेमार्फतच हे काम प्रस्तावित करायचे की, स्वतंत्र संस्था नियुक्त करायची, याबाबत अद्यापही महापालिकेने निर्णय घेतलेला नाही.

मनपाला मिळणार उत्पन्न
सी अँड डी वेस्ट प्रकल्पातून निर्मिती होणाऱ्या साहित्याची विक्री करणे, त्याचा पुनर्वापर करण्याचे अधिकार महापालिकेने राखून ठेवले आहेत. खाजगी कंपनीमार्फत फक्त प्रक्रिया करून साहित्याची निर्मिती केली जाणार आहे. उपलब्ध झालेल्या साहित्याची विक्री करणे अथवा महापालिकेच्या कामासाठी वापरणे याबाबत प्रशासन निर्णय घेणार आहे. साहित्याची विक्री झाल्यास महापालिकेला त्यातून उत्पन्नही मिळणार आहे.

या साहित्याची होणार निर्मिती
शहरातून संकलित होणारा बांधकाम व पाडकामाचा कचरा प्रकल्पात आणून त्याचे विलगीकरण केले जाणार आहे. उपलब्धतेनुसार या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून विटा, पेव्हर ब्लॉक्स व इतर साहित्याची निर्मिती केली जाणार आहे. तसेच विलगीकरणाद्वारे खडी, वाळू वेगळी करून त्याचा पुनर्वापर करता येणार आहे. तसेच काही साहित्य बांधकामासाठी रॉ मटेरियल म्हणूनही वापरता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...