आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • The Contractor Installed 31,000 Lamps, Only 27,000 Were Found On The Roads; Major Roads In The Suburbs Remain In Darkness Even After Completion Of Work |marathi News

दिव्याखाली अंधार:ठेकेदाराने 31 हजार दिवे लावले, रस्त्यांवर 27 हजारच सापडले; कामाची मुदत संपूनही उपनगरातील प्रमुख रस्ते अंधारातच

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण शहरात खासगीकरणातून एलईडी पथदिवे बसवण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. शहरात सुमारे ३१ हजार ५०० पथदिवे लावल्याचा दावा संबंधित संस्थेने केला आहे. मात्र, महापालिकेच्या विद्युत विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीत केवळ २७ हजारच दिवे रस्त्यांवर लावले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सुमारे ५ हजार दिवे लावले कुठे? असा सवाल उपस्थित झाला आहे.

इस्मार्ट या कंपनीमार्फत नगर शहरात खासगीकरणातून पथदिवे बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कार्यारंभ आदेश दिल्यानंतर चार महिन्यात संपूर्ण शहरात पथदिवे बसविण्याचे निर्देश ठेकेदार संस्थेला देण्यात आले होते. या कामाची मुदत ५ फेब्रुवारी रोजी संपली आहे. मात्र, अद्यापही संपूर्ण शहरात आवश्यकतेनुसार पथदिवे बसविण्यात आलेले नसल्याचे चित्र आहे. अनेक नगरसेवकांकडून अद्यापही पथदिव्यांसाठी मागणी सुरूच आहे. दुसरीकडे कंपनीने मात्र, शहरात ३१ हजार ५०० पथदिवे लावल्याचा अहवाल मनपाकडे दिला आहे. विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांच्या पथकाने केलेल्या तपासणीत मात्र, शहरातील रस्त्यांवर व जिथे खांब उपलब्ध नाही, अशा ठिकाणी रस्त्यावर प्रकाश पडेल अशा पद्धतीने खाजगी जागांवर लावलेल्या पथदिव्यांची तपासणी केली. यात केवळ २७ हजार दिवे लावले असल्याचे समोर आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

खाजगी जागांमध्ये व इतरत्र लावण्यात आलेले पथदिवे तपासणीत विचारात घेण्यात आलेले नाहीत. त्यामुळे खाजगी जागांमध्ये व खासगी वापरासाठी कोणाच्या आदेशाने दिवे लावण्यात आले, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, पथदिवे बसवण्याचे काम सुरू झाल्यानंतर या कामावर नियंत्रणासाठी व तपासणीसाठी त्रयस्थ संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, अद्यापही महापालिकेकडून त्रयस्थ संस्थेची नियुक्ती झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पथदिवे बसवण्याच्या कामकाजावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ठेकेदाराला दिलेली मुदत संपुष्टात आली असतानाही अद्याप सावेडी उपनगरातील अनेक रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य आहे. प्रोफेसर कॉलनी चौकातील प्रमुख रस्त्यावरही अद्याप पथदिवे बसविण्यात आलेले नसल्याने व तेथील चालू असलेला हायमॅक्स राजकीय दबावापोटी कोणतेही कारण नसताना व कुठलाही अडथळा नसताना काढण्यात आल्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मीटर बसवण्याचे काम संथगतीने, १५ टक्के मीटर बदलले
शहरातील पथदिवे बसवताना जुने मीटर काढून नव्याने वीज मीटर बसवण्याचे कामही करण्यात येणार आहे. सुमारे अडीचशे मीटर बसवण्यात येणार आहेत. मात्र, अद्यापपर्यंत केवळ १० ते १५ टक्केच मीटर बदलण्यात आले आहेत. मीटर बसवण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. तसेच, पथदिवे लावलेल्या ठिकाणी पोलवर नंबरिंग करणे आवश्यक आहे. मात्र, अद्यापही नंबरिंग करण्यात आलेले नाही.

तक्रार, नियंत्रण कक्ष कागदावरच!
पथदिवे बसवण्यात आल्यानंतर त्याच्या देखभाल दुरुस्तीचे कामही संबंधित संस्थेकडे आहे. संस्थेने तक्रारीसाठी नियंत्रण कक्ष उभारावा, असे स्पष्ट करण्यात आले होते. तक्रारीसाठी, संपर्कासाठी नंबर जाहीर करणे, तक्रार आल्यानंतर त्याची दखल घेऊन बंद असलेले पथदिवे बदलण्याची जबाबदारी ठेकेदारावर आहे. मात्र, कक्ष सुरू न झाल्याने बंद पथदिव्यांबाबत तक्रार करायची कुणाकडे, असा सवाल आहे.

ठेकेदाराने लावलेल्या पथदिव्यांचे मनपाकडून क्रॉस चेकिंग
ठेकेदाराने लावलेल्या पथदिव्यांचे क्रॉस चेकिंग मनपाकडून सुरू आहे. खाजगी जागेत लावलेले, ज्याचा नागरिकांना फायदा नाही, अशा ठिकाणी लावलेले पथदिवे ग्राह्य धरले जाणार नाहीत. तपासणीचा अहवाल आल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. ज्या ठिकाणी पथदिवे बसविण्यात आलेले नाहीत, याबाबत माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल.''
शंकर गोरे, आयुक्त, महापालिका.

बातम्या आणखी आहेत...