आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभंडारदरा धरणाच्या कालवा सल्लागार समितीच्या नियोजनानुसार उन्हाळी हंगाम सिंचनासाठी लाभ क्षेत्रातील शेती सिंचनासाठी उन्हाळ्याचे दीर्घ कालावधीचे आवर्तन मंगळवारी (१० मे) सोडण्यात आले. हे आवर्तन निळवंडे धरणातून मंगळवारी सकाळी ६ वाजता १४०० क्युसेक्सने प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आले. शेती सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी हे आवर्तन सोडण्यात आले आहे. यामुळे प्रवरा नदीलगत परिसरातून वातावरणातील उष्णतामान कमी होण्यास मदत होईल. या आवर्तनात प्रवरा नदीकाठावरील गावांतील तरूणाईला ऐन उन्हाळ्यात नदीत पोहण्याची संधी व आनंद मिळणार आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजता आवर्तन सोडण्यापूर्वी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ४९७८ दलघफू व निळवंडे धरणाचा पाणीसाठा ४३१६ दलघफू शिल्लक होता.
या आवर्तनामुळे भंडारदरा धरणाच्या लाभ क्षेत्रातील नागरिकांची पाण्याअभावी सुकत चाललेल्या शेतातील उभ्या पिकांना जीवनदान मिळणार आहे. या आवर्तनानंतर प्रवरा नदीपात्रातील कोल्हार पासून खालील प्रवरा नदीपात्रालगतच्या गळनिंब (तालुका, नेवासे) पर्यंतचे १४ कोल्हापूर पध्दतीच्या बंधा-यांचे पुनर्भरण करण्यासाठी स्वतंत्र आवर्तन सोडण्याचे संकेत मिळत आहेत. मागील वर्षी या आवर्तनाला जोडूनच हे १४ कटीवेअर पुनर्भरण करण्यासाठी सुरू आवर्तनासोबतच पाण्यात पाणी सोडण्यात आले होते. याप्रमाणे यावर्षीदेखील निळवंडे धरणातून असे आवर्तन सोडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
२५ दिवस हे आवर्तन सुरू राहणार
या आवर्तनातून नदीकाठच्या गावांतील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. या आवर्तनात सिंचनासाठी अंदाजे २ हजार ते २ हजार ५०० दलघफू पाणीवापर होईल असा अंदाज आहे. साधारणपणे २० ते २५ दिवस हे आवर्तन सुरूच राहणार आहे, अशी माहिती अहमदनगर येथील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नोर व भंडारदऱ्यातील सहाय्यक अभियंता अभिजीत देशमुख यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.