आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंगमनेर तालुक्यातील सावरगावतळ येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब पांडुरंग नेहे यांनी रविवारी आपल्या लाडक्या पिंट्या बैलाचा दशक्रियाविधी करत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. पिंट्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण व शाळेला देणगी देत आयुष्यभर केलेल्या कष्टाबद्दल अनोखी श्रद्धांजली वाहिली.
बाळासाहेब नेहे यांच्याकडे ‘पिंट्या व सुरत्या’ नावाची बैलजोडी होती. पिंट्या बैलाचे दहा दिवसांपूर्वी अचानक निधन झाले. २७ वर्ष पिंट्या-सुरत्या बैलजोडीच्या सहायाने नेहे यांनी शेतीत प्रचंड काबाडकष्ट करत नंदनवन फुलवले. या बैलजोडीमुळे त्यांचा गोठा गोकुळासारखा फुलला. आर्थिक संपन्नता आल्याने त्यांचे जीवन सुखकारक झाले. नेहे यांनी या बैलजोडीवर मुलांप्रमाणे अतोनात प्रेम केले. पिंट्या बैलाचे निधन झाल्याने एक सदस्य गेल्याचे दुःख नेहे कुटुंबाला झाले. दहा दिवसांचा दुखवटा पाळण्यात आला.
सर्व धार्मिक विधी पूर्ण करत बैलाचा दशक्रिया विधी करण्यात आला. एरंडे महाराज यांचे प्रवचन, तर पुरोहित नंदू जाखडी यांनी सर्व धार्मिक विधी पार पाडले. सावरगावतळ गावच्या परंपरेनुसार पिंट्या बैलाच्या स्मृती चिरंतन जतन करण्यासाठी केशर आंबा रोपांचे रोपण करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण व संगणक कक्ष निर्मितीसाठी भरीव आर्थिक देणगी नेहे कुटुंबाने दिली.
बाळासाहेब नेहे यांनी राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे. सावरगावतळ गाव नेहमी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात अग्रेसर आहे. आज समाजामध्ये माणूस माणसाला सांभाळण्याचे टाळतो आहे. वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारे अनेक महाभाग समाजात असताना ज्या जनावरांमुळे आपली प्रगती झाली, त्यांच्याप्रती अशी सहृदयी कृतज्ञता व्यक्त करणारे व्यक्ती समाजात आहेत, अशी प्रतिक्रिया पोलिस पाटील गोरक्ष नेहे यांनी व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.