आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयुष्याचा जोडीदार कोरानाने हिरावून नेल्यानंतर उर्वरित जीवनवाट एकटीनेच चालायची होती. अशा एकल महिलांची मोट बांधून त्यांना स्वयंरोजगारातून उन्नती साधण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. कोरोनाने हिरावलेल्या स्वप्नांना पुन्हा आकार देण्यासाठी महिलांनी भरारी घेण्याचा निर्धार जिल्ह्यातील ३ हजार महिलांनी केला आहे. त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी शासनाच्या पाठबळाची गरज आहे. अकोले तालुक्यातून हेरंब कुलर्णी यांनी एकल महिलांसाठी कार्य करण्याचा निर्णय घेऊन ‘एकल महिला पुनर्वसन’ समितीची स्थापना दोन वर्षांपूर्वी केली होती. या महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याची चळवळ राज्यभर जोमात सुरू झाली. या प्रयत्नांना सामाजिक संस्थांचे पाठबळ मिळाले. समितीच्या शासनासमवेत बैठका झाल्या. त्यात एकल महिलांचा विषय अजेंड्यावर राहिला. या माध्यमातून तालुकानिहाय तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली वात्सल्य कमिट्या स्थापन झाल्या आहेत. समितीने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात अशा ३ हजार एकल महिला असून, त्यांच्या पतीचे निधन कोरोनामुळे झाले आहे.
तालुकानिहाय सोशल मीडिया ग्रूप सुरू करण्यात आला. असा पहिला समूह अकोले तालुक्यात स्थापन झाला. अनेक सामाजिक संस्थांनी या महिलांना पाठबळ देण्यासाठी प्रयत्न केले. ३०० महिलांना शिवणकामासाठी शिलाई मशीन, २५० शेळीवाटप, पिठाची गिरणी, या महिलांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी सुमारे ४० लाखांची मदत लोकसहभागातून उभारण्यात पुनर्वसन समितीला यश आले आहे. आदिशक्ती महिला फाउंडेशनच्या अध्यक्ष जया पालवे, पुनर्वसन समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक कुटे महिलांना मार्गदर्शन करीत आहेत.
राज्यभर वाढली चळवळ
एकल महिला पुनर्वसन समितीची मुहूर्तमेढ अकोले तालुक्यात रोवली गेली. सोशल मीडियावर ग्रूप करून त्यांना एकमेकींशी जोडले. शासन स्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे तालुकास्तरावर वात्सल्य कमिट्यांची स्थापना झाली. बालसंगोपन योजनेतून त्यांच्या मुलांसाठी २५०० रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य मिळाले.- अशोक कुटे, जिल्हाध्यक्ष, महिला पूनर्वसन समिती.
स्वप्नपूर्ती बचतगटाची अल्पावधीत भरारी
आठ ते दहा एकल महिलांनी एकत्र येऊन बचतगट स्थापन केला आहे. त्यात कोरोनामुळे पतीचे निधन झालेल्या, तसेच इतर कारणांमुळे एकल झालेल्या महिलांचा समावेश होता. साई ज्योती स्वयंसहाय्यता प्रदर्शनात खाद्यपदार्थ स्टॉलच्या माध्यमातून चार दिवसांत आम्ही दोन लाखांची उलाढाल केली.- मेघा वरखेडकर, अध्यक्ष, स्वप्नपूर्ती बचतगट
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.