आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद:पोलिस उपअधीक्षक संदीप मिटकेंच्या मध्यस्थीने मिटला कुकाण्यातील वाद

कुकाणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या तीन महिन्यांपासून धुमसणारा वाद आज पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मध्यस्थीने शमला. न्यायालयीन जो निर्णय होईल, तो मान्य करण्याचे ठरल्याने कुकाण्यातील बांधकामावरून निर्माण झालेले वादळ थांबले. कुकाण्यातील वादावर पडदा पडल्याचे कळताच ग्रामस्थांनीही सुटकेचा निश्वास सोडला. कुकाण्यातील ग्रामपंचायतीच्या जागेवरील बांधकामांवरून तीन महिन्यांपासून वाद उभा राहिला होता.

यावरून गेल्या शनिवारी कुकाण्यात दोन गटांत धुमश्चक्री झाली होती. त्यातून शंभराहून अधिक जणांवर गुन्हेही नोंदवण्यात आले. या वादाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी कुकाणे ग्रामपंचायत कार्यालयात उपअधीक्षक मिटके, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, गटविकास अधिकारी संजय दिघे, पोलिस निरीक्षक विजय करे, सरपंच लता अभंग, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब महाजन आदींच्या उपस्थितीत बैठक झाली.

व्यावसायिकांच्या वतीने रसुलभाई इनामदार, शिवाजीराव शिंदे, आबासाहेब रिंधे, संदीप कोलते, महेश हांडे, बाळासाहेब बोरा, राजेंद्र म्हस्के, तर हरकत घेणारे मुसा इनामदार, सलिम शहा, इसाक इनामदार यांनी आपापल्या बाजू मांडल्या. युवा नेते अमोल अभंग व ग्रामविकास अधिकारी महाजन यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने बाजू मांडली. यावेळी दोन्ही बाजुंच्या वतीने न्यायालयीन निर्णय मान्य करण्याचे ठरले. बांधकामे सुरू ठेवण्यासही न्यायालयीन निर्णय मान्य करण्याच्या अटींवर मुभा देण्याचे ठरले. माजी सरपंच एकनाथ कावरे व दौलतराव देशमुख, अशोक गांधी, सुनील गोर्डे, अॅड. गणेश निकम, सोमनाथ कचरे, प्रशांत देशमुख, अनिल गर्जे, माजी सरपंच कारभारी गोर्डे व मच्छिंद्र भोसले, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र खराडे व हमीदाबी शेख आदी यावेळी उपस्थित होते. जिथे एकोपा असतो तिथे विकासाला चालना मिळते असे मिटके यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...