आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकामगार विरोधी दिन:जिल्हा बालकामगार मुक्त करणार; सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले यांची ग्वाही

नगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर जिल्ह्यात बालमजुरीचे प्रमाण खूप वाढले आहे. हॉटेल व उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बालमजूर ठेवण्याचे प्रमाण वाढते आहे. आगामी काळात जिल्हा बाल कामगार मुक्त करणार, अशी ग्वाही सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले यांनी रविवारी दिली.

बालकामगार विरोधी दिनानिमित्त स्नेहालय संचलित अहमदनगर चाइल्डलाइन आणि सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कवले बोलत होते. नुकताच दोन दिवसांपूर्वी जागतिक बालकामगार विरोधी दिवस जगभरात साजरा करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी यास्मिन शेख, तुषार बोरसे, अंबादास केदार, प्रकाश भोसले, अमोल गायकवाड तसेच अॅड. अनुराधा येवले, महेश सूर्यवंशी, वैभव देशमुख आदी उपस्थित यावेळी होते. बालमजूर कमी मजुरीत कितीही तास राबवून घेतले जातात. शेतात मजूर मिळत नसल्याने लहान मुलांचा वापर वाढला आहे. स्थानिक पातळीवर कोणीच वाईटपण नको म्हणून याला विरोध करत नाही. जिल्हा बाल कामगार मुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे, असे कवले म्हणाले.

प्रशासनाने कितीही प्रयत्न केले तरी या मोहिमेत यशस्वी होण्यासाठी सर्वांचीच साथ आवश्यक आहे. त्यामुळे कोठेही बालकामगार दिसले, तर त्यांचे त्वरीत प्रशासनाला कळवावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

मिशन ऑपरेशन मुस्कान
जागतिक बालकामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलातील अवैध मानवी वाहतूक विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक भीमराज नांदूरकर, चाईल्डलाईन ही सेवाभावी संस्था संयुक्तपणे बालकामगारांचा शोध घेत आहे. अशा बालकांकडून कोणी कमी पैशामध्ये काम करुन त्यांचा छळ करत असेल, तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या पथकाने आतापर्यंत शनिशिंगणापूर व शिर्डी येथे कारवाई करुन ११ बालकामगारांची सुटका केली आहे.

बातम्या आणखी आहेत...