आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा:नगर जिल्ह्यातील 18 उपकेंद्रावर होणार परीक्षा; निवासी उपजिल्हाधिकारी यांची माहिती

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2022 शनिवारी 5 नोव्हेंबरला अहमदनगर जिल्ह्यातील 18 उपकेंद्रावर होणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 12 यावेळेत ही परीक्षा घेण्यात येईल, अशी माहिती परीक्षेचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी बुधवारी (2 नोव्हेंबरला) दिली आहे.

625 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

या परीक्षेसाठी अहमदनगर शहरातील 18 उपकेंद्रावर एकूण 6 हजार 652 उमेदवार परीक्षेस बसलेले आहेत. या परीक्षेसाठी उपजिल्हाधिकारी संवर्गातील समन्वय अधिकारी-5 , भरारी पथक प्रमुख-1, वर्ग 1 संवर्गातील उपकेंद्र प्रमुख - 18 अधिकारी तसेच पर्यवेक्षक, सहायक, समवेक्षक, मदतनीस असे विविध वर्ग 3 संवर्गातील एकूण 625 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

काळया शाईचे बॉलपॉइंट पेन वापरणे आवश्यक

परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर सकाळी 9.30 वाजता प्रवेश देण्यात येणार आहे. उमेदवारांनी काळया शाईचे बॉलपॉइंट पेन वापरणे आवश्यक असून उमेदवारांना एकमेकांचे पेन लिखान साहित्य वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. मोबाईल पेजर डिजीटल डायरी, मायक्रोफोन, स्मार्टवॉच यांसारखी दूरसंचार साधने व कॅल्क्युलेटर परीक्षा केंद्राच्या परीसरामध्ये आणि परीक्षा दालनात आणण्यास व स्वतःजवळ बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारास सदर परिक्षेसाठी व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुढील सर्व परीक्षांसाठी कायमस्वरूपी प्रतिरोधीत करण्यात येणार आहे.

राजेंद्रकुमार पाटीलांची माहिती

परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांनी स्वतः आयोगाच्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यायची आहेत. दुय्यम प्रवेश प्रमाणपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयामधून देण्यात येणार नाहीत याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. असेही राजेंद्रकुमार पाटील यांनी सांगितले.

परीक्षा उपकेंद्रावर 144 कलम लागू

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरातील एसटीडी बुथ, फॅक्स मीटर, झेरॉक्स दुकाने बंद ठेवणेकामी परिक्षेच्या दिवशी परिक्षाक्षेत्रामध्ये सकाळी 7 वाजेपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता कलम 144 (3) लागू करण्यात आलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...