आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृष्टिदान दिन:डोळा म्हणजे मानवाला निसर्गाने दिलेली अनमोल ठेव ; नेत्रदान चळवळीची जनजागृती

नगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोळ्याने जीवनाचा खरा आनंद घेता येतो. डोळ्यांशिवाय जगणे अशक्य आहे. यासाठी डोळ्यांची निगा राखणे आवश्यक आहे. मानवाला निसर्गाने दिलेली अनमोल ठेव म्हणजे डोळा आहे, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा नेत्र विभाग प्रमुख नेत्रशल्य चिकित्सक डॉ. संतोष रासकर यांनी केले. जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागातर्फे जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त नेत्रदान चळवळीची जनजागृती करुन, गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयात परिसरात राबविण्यात आलेल्या उपक्रमात युवक व ज्येष्ठ नागरिकांनी नेत्रदानाचे संकल्प अर्ज भरले. त्यावेळी ते बोलत होते. मरावे परी नेत्र रुपी उरावे... हा संदेश देत राबवण्यात आलेल्या कार्यक्रमास डॉ. साजिद तांबोळी, डॉ. अजिता गरुड, डॉ.भूषण अनभुले, जिल्हा नेत्रदान समुपदेशक सतीश अहिरे, नेत्रचिकित्सा अधिकारी संतोष चौधरी, विवेक दिक्षित, मधुकर जत्ती, मंगेश वाचकवडे, पूजा राठोड आदी उपस्थित होते. डॉ. रासकर म्हणाले, रोज मरणाऱ्यांपैकी एका व्यक्तीचे डोळे दान केल्यास जवळपास सर्वच अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होणार आहे. फक्त नेत्रदान संकल्प अर्ज भरून नव्हे, तर प्रत्यक्ष मृत्यूनंतर जवळच्या नेत्र पेढीमध्ये नेत्रदान झाल्यास खर्या अर्थाने दृष्टीदान दिवस साजरा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात जिल्हा नेत्रदान समुपदेशक सतीश अहिरे यांनी भारताच्या लोकसंख्येपैकी तीस टक्के अंध व्यक्ती आहेत. दरवर्षी भारतात ७५ हजार ते १ लाख नेत्रबुब्बळांची गरज भासते. महाराष्ट्रात दरवर्षी ३५ हजार रुग्णांना डोळ्यांची आवश्यकता आहे. मात्र महाराष्ट्रात फक्त सहा ते आठ हजार नेत्रबुब्बुळे उपलब्ध होतात, एप्रिल २०२१ ते मे २०२२ पर्यंत जिल्हा रुग्णालय व जिल्ह्यातील नेत्र पेंढ्याच्या सहकार्याने नेत्रदान चळवळीच्या माध्यमातून १२७ नेत्रबुब्बळांचे संकलन केले आहे. तर ७२ नेत्ररोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या, असल्याची माहिती दिली. यावेळी आलेल्या रुग्णांची नेत्रतपासणी करुन मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर रुग्णांना मोफत डोळ्यांचे ड्रॉप्स, चष्मा, औषधेही देण्यात आले. जिल्हा रुग्णालयाच्या नेत्र विभागात गरजूंवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जात असून, याचा लाभ घेण्याचे व मरणोत्तर नेत्रदान करण्याचे आवाहन करण्यात आले. सूत्रसंचालन विवेक दिक्षित यांनी, तर आभार संतोष चौधरी यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...