आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनवाबनवी:लग्नाळूंच्या स्वप्नांवर ठग अन् एजंटांचा डोळा‎

जितेंद्र निकम |नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका‎ लग्न ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली‎ आहे.आजमितीला लाखो तरुण लग्नाच्या‎ उंबरठ्यावर असून अनेकांची वय उलटून गेली‎ आहेत. मुलींची स्थळे दाखवतो म्हणून अनेक‎ बोगस वधू वर सूचक मंडळे, अनेक एजंट या‎ तरुणांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना राजरोस‎ फसवत आहेत. फसवणूक होऊनही इज्जतीचा‎ पंचनामा नको म्हणून पीडित कुटुंबीय गप्प राहत‎ असल्याने या एजंटांचे प्रस्थ मात्र वाढत चालले‎ आहे.‎ गावोगावी शेकडो, हजारो तरुण अविवाहित‎ स्थितीत आहेत. पूर्वी मुलीला हुंडा द्यावा लागत‎ होता पण आता परिस्थिती बदलली आहे. फक्त‎ मुलगी द्या आम्ही सर्व करून घेतो, असे म्हणूनही‎ लग्नासाठी मुली मिळेनाशा झाल्या आहेत. त्यातच‎ मुली आणि त्यांचे पालक यांच्या अपेक्षा‎ वाढल्याचेही दिसून येत आहे.

नोकरीच हवी,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ बरोबर फ्लॅट, बंगला गाडी, जमीन या अपेक्षामुळे‎ अनेक मुली लग्नाचे वय ओलांडून पुढे जात‎ आहेत. नोकरी नसल्याने अनेक तरुण व्यवसाय‎ किंवा शेती करत आहेत त्यांची अवस्था तर बिकट‎ आहे. परिणामी लाखो तरुण लग्नाचे स्वप्न पाहून‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अविवाहित आहेत आणि याचाच गैरफायदा‎ समाजातील काही लोक घेत आहेत.‎ आजमितीला समाजात अनेक बोगस वधू वर‎ सूचक मंडळे निर्माण झाली आहेत. सोशल‎ मीडियावर आलेल्या इच्छुक वराच्या बायोडाटा‎ वरील फोन नंबरवर हे लोक फोन करतात.

सुंदर‎ मुलींचे फोटो पाठवून तुम्हाला योग्य स्थळ देतो‎ पाच हजार, दहा हजार ऑनलाइन भरण्यास‎ सांगितले जाते. सुरुवातीला मुलींचे फोटो, संपर्क‎ नंबर नसलेल्या खोट्या बायोडाटा सह माहिती‎ पाठवली जाते. पैसे मिळाले की तो क्रमांक बंद‎ होतो. तसेच काही एजंट २ लाख,तीन लाख‎ कमिशन घेऊन लग्न लावून देतात. लग्न‎ झाल्यानंतर २ ते ३ दिवसांत नवरी घरातील‎ दागदागिने घेऊन पसार झालेली असते. अशा‎ घटना गावोगावी घडत आहेत. फसवणूक होऊनही‎ लग्नाळू तरुण आणि त्यांचे कुटुंबीय वाश्चता नको,‎ इज्जतीचा पंचनामा नको म्हणून चूप राहणेच पसंत‎ करत आहेत. फसवणूक करूनही कोठे तक्रार‎ किंवा वाच्यता होत नसल्याने या ठगांची दुकानदारी‎ राजरोस सुरू आहे. यामुळे मात्र प्रामाणिकपणे वधू‎ वर सूचक मंडळे किंवा सामाजिक कार्य मोफत‎ करणाऱ्या लोकांकडेही लोक आता संशयाने पहात‎ आहेत.‎

फसवणूक झाली‎ पण सांगू कसं‎ माझ्या मुलाचा बायो डाटा एका ग्रुपवर टाकला‎ होता. मला पुण्याच्या वधू वर सूचक मंडळामधून‎ फोन आला. सुरुवातीला काही चांगल्या मुलींचे‎ बायो डाटा मला पाठवण्यात आले त्यावर‎ पत्ता,फोन नंबर नव्हते. जर संपर्क करायचा‎ असेल तर पाच हजार ऑनलाइन पाठवा असे‎ सांगितले. मी पैसे पाठवले आणि आता तो फोन‎ नंबर बंद लागत आहे, असे एका पालकाने नाव‎ न छापण्याच्या अटीवर सांगितले.‎

विचार करून विश्वास ठेवा‎ व्यावसायिक, शेतकरी मुले श्रीमंत असतात, स्वतः‎ मालक असतात. मग मालक व्हायचे की नोकर याचा‎ मुली आणि पालकांनी विचार केला पाहिजे. कोरोना‎ काळात आणि आर्थिक मंदीत अनेक नोकरदार घरी‎ आले आहेत. सर्वच नोकऱ्या आता अशाश्वत‎ झालेल्या आहेत. याचाही विचार व्हावा. मुलाच्या‎ पालकांनीही फसवणूक टाळण्यासाठी नाते गोते,‎ ओळखीचे लोक, आणि ओळखीच्या संस्थांवरच‎ विश्वास ठेवला पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...